घाटकोपर (वार्ताहर) : सोमवारी शिक्षक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेते सुशीला देवी आणि अविनाश साबळे यांनी त्यांच्या यशात योगदान दिलेल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भारताला रौप्य पदक मिळवून देण्यासाठी प्रशिक्षक जीवन शर्मा आणि जयविर सिंग यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजयापूर्वी केलेल्या मेहनतीची आणि प्रशिक्षणाच्या स्मृतीला सुशीला देवी आणि अविनाश साबळे यांनी यावेळी उजाळा दिला.
शिक्षक दिनाचे निमित्त साधत बीकेसी येथील सोफीस्टेल हॉटेल येथे शिक्षक आणि शिष्य या दोघांच्या मिलापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या शाळकरी मुलांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ग्रीटिंग कार्ड मधून राष्ट्रनिर्मात्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपक्रमाच्या प्रारंभावर भाष्य करताना आय टी सी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज रुस्तगी म्हणाले शिक्षक हे ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत. ते आम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून वावरण्यासाठी घडवत असतात.
रौप्य पदक विजेती सुशीला देवी म्हणाल्या की, मी लहान वयातच या खेळाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. माझ्या प्रशिक्षकाने संकटात मला खंबीर राहण्याची व सर्व लढ्यांचा सामना करण्याची शक्ती दिली.
रौप्य पदक विजेता अविनाश साबळे म्हणाला की, माझ्या देशाला सन्मान मिळवून देण्यासाठी अतूट मानसिकता निर्माण केल्याबद्दल माझ्या प्रशिक्षकांचे आभार मानण्याची मला संधी मिळाली. देशासाठी पदक मिळवताना अंतिम विजयासाठी मला घडविले आणि प्रोत्साहन दिले.