मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या भारतीयांची एक खासियत आहे, आपण एरवी आपापसात भांडत असतो, पण जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा आपण एकत्र येतो संकटाचा सामना करतो. कोविड काळातही याच गोष्टीचा प्रत्यय आला. आज ज्या मुलांचा सत्कार केला जातोय त्या मुलांनी कोविडमध्ये आपल्या पालकांना गमावूनही उत्तम अभ्यास केला आणि घवघवीत यश मिळवले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
एकता मंचने आणि सबर्बन डीस्ट्रीक्ट लीगल अथॉरिटीने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. त्यांच्या हस्ते अजय कौल यांच्या ‘एकता मंच’ या सेवाभावी संस्थेतर्फे १५ एसएससी, १० टीवायबीकॉमच्या आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांचा त्यांनी कोविड काळात केलेल्या अतुलनीय अशा कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. दहावीच्या या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक कोविड काळात मृत झाल्यानंतरही उत्तम गुण मिळविले होते. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या काळात समाजसेवेचे एक वेगळे परिमाण घालून दिले. या सर्वांचा सत्कार आज राज्यपालांच्या हस्ते वर्सोवा यारी रोड येथील चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूलमध्ये करण्यात आला.
‘या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कोविडमध्ये आपल्या पालकांचा मृत्यू होवूनही या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या गुणांची पारख ठेवत एकता मंचचे श्री अजय कौल यांनी त्यांचा यथोचित गौरव केला. कौल हे स्वतः तन, मन आणि धन या तिन्ही गोष्टीत झोकून देत कोविड काळात काम करत होते. ज्यांचा गौरव केला गेला ती मुले, स्वयंसेवक यांच्याबरोबरच कौल यांचेही या निमित्ताने मी कौतुक व अभिनंदन करतो,’ असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.
एकता मंचने आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी नुकत्याच एका भव्य रॅलीचे आयोजन वर्सोवा येथे केले होते आणि त्यावेळी त्यांनी तब्बल २५ कोविड योद्ध्यांचा सत्कारही केला. त्यांमध्ये दफनभूमीमध्ये खड्डे खोदणारे तसेच पालिका कर्मचारी,पोलीस कर्मचारी, विविध रुग्णालयांमधील पॅरा मेडिकल कर्मचारी आदींचा समावेश होता.