नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांनी अनेक क्षेत्रांत आपली क्षमता जगात सिद्ध केली आहे. अवकाश असो की संशोधन; व्यवसायात भारतीयांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. भारतीय नवउद्योजकांनी अमेरिकेत आपला झेंडा रोवला आहे.
भारतीय तरुण अमेरिकेत शिकायला जातात आणि तिथेच नोकरी मिळवण्यात धन्यता मानतात, असा समज होता; परंतु आता भारतीय केवळ नोकऱ्या मिळवण्यासाठीच जात नाहीत, तर तिथे उद्योग सुरू करून रोजगार देणारे हात झाले आहेत. अमेरिकेतल्या नवउद्योजकांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा अधिकजण भारतीय आहेत. त्यांच्या उद्योगांचे भांडवल काही अब्ज डॉलर इतके आहे. अमेरिकेतल्या निम्म्याहून अधिक ‘स्टार्टअप्स’ची किंमत एक अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. भारतीय वंशाच्या नवउद्योजकांनी तिथल्या ‘स्टार्ट अप्स’मध्ये आघाडी घेतली आहेच, पण मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध केला आहे. भारतीयांचे नाणे खणखणीत आहे, हे यावरुन सिद्ध झाले आहे.
आज जगातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी भारतीयांना पसंती देण्यात येत आहे. या कंपन्यांची धुरा भारतीय मोठ्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. भारतीय टँलेंटला जगाने सलामी दिली आहे. अमेरिकेतल्या युनिकॉर्न कंपन्यांमध्ये अर्ध्याअधिक कंपन्या भारतीयांच्या आहेत. आर्थिक व्यवस्था मजबूत होत असताना इतर देशांमध्येही भारतीयांनी आपल्या देशाची मान उंचावली आहे, ही अभिमानास्पद कामगिरी आहे. भारतीयांनी कंपन्या केवळ स्थापन केल्या नाहीत, तर यशस्वीपणे चालवल्या आहेत. या कंपन्यांची उलाढाल कित्येक अब्ज डॉलरची आहे. अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक ‘स्टार्टअप्स’ची सुरुवात भारतीयांनी केली आहे. ५८२ पैकी ३१९ युनिकॉर्न कंपन्या भारतीयांच्या आहेत. हा वाटा ५५ टक्क्यांहून पुढे जातो. या प्रत्येक युनिकॉर्नचे भागभांडवल एक अब्ज डॉलर्स अथवा त्याहून अधिक आहे.
ही चमकदार कामगिरी एवढ्यावरच थांबते असे नाही, तर दुसऱ्या स्थानीसुद्धा भारतीयांचाच डंका आहे. ज्या ५४ अब्ज डॉलर्सच्या कंपन्या आहेत, त्यात भारतीयांचे प्रमाण अत्यंत लक्षणीय आहे. म्हणजे भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांनी नोकरदाराची झूल बाजूला सारून चक्क अमेरिकेच्या उभारणीत वाटा देऊन परतफेड केली आहे.
अमेरिकेच्या उद्योगांमध्ये भारतीयांनी मोठी झेप घेतली आहे. या यादीत ६६ कंपन्यांसह भारतीय अव्वल आहेत. अमेरिकेतल्या उद्योगांमध्ये स्थलांतरीत संस्थापकांचा वाटा मोठा आहे. दुसऱ्या स्थानी चिमुकल्या इस्त्रायलचे उद्योजक आहेत. त्यानंतर ब्रिटन, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आदी देशांनी अमेरिकेच्या ‘स्टार्ट-अप इकोसिस्टीम’मध्ये योगदान दिले आहे, असे ‘नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’ च्या ताज्या अहवालात म्हटले आहे.