Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीसंजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. याआधी २३ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज PMLA कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली.

ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप केला होता.

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -