जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रविवारी आपल्या नव्या पक्षाबाबत मोठी घोषणा केली. जे हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चनांना समजेल आणि सामावून घेईल, असे माझ्या पक्षाचे नाव ‘हिंदुस्थानी’ असेल, अशी घोषणा गुलाम नबी आझाद यांनी रविवारी केली.
काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जो नवा पक्ष स्थापन होत आहे. त्याला लोक नाव ठेवतात, ते चुकीचं आहे. माझ्या पक्षाचे नाव आणि ध्वज जम्मू-काश्मीरचे लोक ठरवतील. मी आता दिल्लीत बसून तुमच्यासाठी फर्मान काढणार नाही की, हा माझा झेंडा आणि हे माझे नाव आहे. अनेक नावे माझ्याकडे आली. काहींमध्ये उर्दू जास्त, तर काहींमध्ये संस्कृत जास्त. पण, माझ्या पक्षाचे नाव हिंदुस्थानी असेल. जे हिंदू-मुस्लीम-शीख आणि ख्रिश्चन या सर्वांना लवकर समजेल.
पक्षाच्या अजेंड्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नसून राज्यपाल असणार आहे. जमीन, अधिवास आणि रोजगाराचा पूर्ण अधिकार बहाल करणे हे माझे पहिले कार्य आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तरुणांनाच रोजगार मिळावा, यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. बिहारमधील कोणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये, याकरताही प्रयत्न असेल. काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांना परत सेटल करणे हाही माझ्या अजेंड्याचा भाग आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या हत्या थांबल्या पाहिजेत. यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.