मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांची जागतिक कॉमनवेल्थ तायक्वांदोच्या व्यवस्थापन मंडळ सदस्यपदी निवड झाली आहे. या मंडळावर नियुक्त झालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत.
ऑस्ट्रेलिया येथे २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळामध्ये तायक्वांदो या खेळाचा सहभाग व्हावा यासाठी जागतिक तायक्वांदो संघटनेच्या वतीने प्रत्येक खंडातून एका सदस्याची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आशिया खंडातून नामदेव शिरगावकर यांची निवड करण्यात आली. जागतिक तायक्वांदोचे अध्यक्ष डॉ. चुंगवॉन चौ यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
जागतिक कॉमनवेल्थ तायक्वांदोच्या व्यवस्थापकीय मंडळात नियुक्ती होणे आणि काम करायला मिळणे हा माझा सन्मान समजतो. भारत देश आशियातील प्रमुख तायक्वांदो हब बनण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे या संधीच्या माध्यमातून त्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे. तायक्वांदो खेळाडूंसाठी चांगले काम भविष्यात करणार असल्याची ग्वाही देखील शिरगावकर यांनी दिली. जागतिक तायक्वांदोसह प्रत्येक देशाच्या संबंधित फेडरेशन तायक्वांदोचा कॉमनवेल्थ खेळ म्हणून समावेश करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष या नात्याने खेळाडूंना अधिकाधिक सुविधा आणि खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.