नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय (महिला आणि पुरूष) सामन्यांसाठी मास्टरकार्ड भारतीय संघाचे शीर्षक प्रायोजक असणार आहे.
मास्टरकार्ड हे घरच्या मैदानावर आयोजित सर्व सामने आणि आंतरराष्ट्रीय सामने (महिला आणि पुरुष दोन्ही), बीसीसीआयतर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (१९ आणि २३ वर्षांखालील) शीर्षक प्रायोजक असणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले की, आगामी काळात घरच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी शीर्षक प्रायोजक म्हणून मास्टरकार्डचे स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय मालिकेबरोबरच बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा महत्वाच्या आहेत. कारण त्या देशाला एक मजबूत आंतरराष्ट्रीय संघ बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
भारताचा माजी कर्णधार धोनीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. धोनी मागील चार वर्षांपासून मास्टरकार्डचा ब्रँड अॅम्बेसीडर आहे. धोनी म्हणाला, क्रिकेट हे माझे जीवन आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते मला क्रिकेटने दिले आहे. मास्टरकार्ड बीसीसीआयचे सर्व देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय सामने आणि विशेषत: ज्युनियर आणि महिला क्रिकेटचे प्रायोजकत्व करत आहे याचा मला आनंद आहे.