Monday, February 17, 2025
Homeमहत्वाची बातमीगुगल तुम्हाला माहिती देते पण ज्ञान फक्त शिक्षकांकडूनच मिळते : मुख्यमंत्री एकनाथ...

गुगल तुम्हाला माहिती देते पण ज्ञान फक्त शिक्षकांकडूनच मिळते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला. आज एका क्लिकवर जग जोडले गेले आहे. असे असले तरी गुगलसारखे तंत्रज्ञान तुम्हाला माहिती देऊ शकते पण ज्ञान देऊ शकत नाही. ते फक्त तुम्हाला शिक्षकच देऊ शकतात, असे शिक्षकांबद्दल अभिमानास्पद वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे तुमचं आमचं सर्वांचं सरकार आहे. शिक्षणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शिक्षकांनी ज्या काही सूचना केल्या त्याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल. तसेच शिक्षकांचे पगार वेळेवर झाले पाहिजे त्यासाठी शिक्षण विभागाला आदेश देणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, सुरुवातीला मी तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. शिक्षकांविषयी प्राचीन काळापासून आदर आहे. प्रत्येक जण यशस्वी जीवनाचा विचार करतो तेव्हा त्याला शिक्षकांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आईवडिलांनंतर शिक्षकांचे मोठे योगदान आपल्या आयुष्यात असते. माझ्या आयुष्यात देखील शिक्षकांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मी शिकलो. आम्हाला रघुनाथ परब गुरुजी होते. आमचं नातं खूप भारी होतं, आम्ही गुरुजींची सेवा करायचो, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुंभार जसा मातीला आकार देतो तसेच शिक्षक आपल्या जीवनाला आकार देतात. त्यामुळे त्यांचे योगदान कधीही विसरण्यासारखे नसते, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटले की, शिक्षकांच्या काही समस्या आहेत. आम्ही त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक वाटचालीत महाराष्ट्र देशात अग्रणी राहिला आहे. महाराष्ट्राला ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव नेहमी पुढे असते.

ते म्हणाले की, राज्यातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विद्यार्थी केंद्रीत विचार शिक्षणव्यवस्थेत आणला जात आहे. शिक्षण हे समाजनिर्मिती करणारे क्षेत्र आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -