Wednesday, April 30, 2025

महामुंबई

मुंबईकरांकडून गणेश दर्शन बससेवेला 'बेस्ट' प्रतिसाद

मुंबईकरांकडून गणेश दर्शन बससेवेला 'बेस्ट' प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेप्रमाणेच बेस्ट उपक्रमानेही यंदा गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी विशेष सेवा देऊ केली आहे. विशेषतः दक्षिण मुंबईत प्रसिद्ध गणपतीचे दर्शन रात्रीच्या वेळेत घेण्यासाठी विशेष बससेवा सुरू केली आहे. या विशेष बस सेवेला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गणेशोत्सवासाठी बेस्टने बससेवा सुरू केल्यापासून विविध बस मार्गांवर चालणाऱ्या बस गाड्यांमधून एकंदर ४ हजार प्रवाशांनी लाभ घेतला असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.

मुंबईत परळ, लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकी, भायखळा, गिरगाव आदी परिसरातील प्रसिद्ध खेतवाडी, लालबागचा राजा, तेजकाया आदी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळी मित्रमंडळी, परिवारासह घराबाहेर पडतात. ते रेल्वे प्रमाणेच बेस्ट बसमधूनही प्रवास करतात. मात्र गणेश भक्तांची वाढती गर्दी पाहता त्यांना गणेश दर्शन सुलभ व जलद व्हावे आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने बेस्ट परिवहन विभागाने यंदाच्या गणेशोत्सवात रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत विशेष बस सेवेची सुविधा गणेशोत्सव सुरू झाल्यापासून उपलब्ध केली आहे.

या विशेष बस सेवेत खुल्या दुमजली बस गाड्या, बस योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्या तसेच संपूर्ण रात्रभर विविध बस मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष बस गाड्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवा दरम्यान राबविण्यात आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. या सेवेअंतर्गत आणि खुल्या दुमजली बस गाड्यांमधून शनिवारी रात्रभरात ५०० प्रवाशांनी लाभ घेतला.

तसेच, विविध बस मार्गांवर चालणाऱ्या बस गाड्यांमधून एकंदर ४ हजार प्रवाशांनी लाभ घेतला असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. बेस्ट उपक्रमाने राबविलेल्या या विशेष बस सेवा मोहिमेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल बेस्ट उपक्रमाने मुंबईकर जनतेचे आभार मानले आहेत. या बस सेवेला उर्वरित दिवसातही असाच भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment