Friday, May 9, 2025

ठाणे

मीरा रोडसह कल्याण-तळोजा मेट्रोसाठी २६८ कोटींचे सल्लागार

मीरा रोडसह कल्याण-तळोजा मेट्रोसाठी २६८ कोटींचे सल्लागार

नवी मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-भिवंडी आणि नवी मुंबई या पाच महानगरांना जोडणाऱ्या एकूण दोन मेट्रो मार्गांच्या स्थापत्य व प्रणाली कामांसाठी अखेर एमएमआरडीएसला सल्लागार मिळाले आहेत. यासाठी एमएमआडीएकडून मान्यता मिळाल असून सल्लागारांवरील एकूण रक्कम ही २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये आहे.


मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजासाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए आणि मेसर्स डी.बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबी यांच्या संयुक्त निविदेला एमएमआरडीएने आपल्या २७१ व्या बैठकीत मान्यता दिली आहे.


मेट्रो मार्ग क्रमांक १० ची एकूण किंमत ४४७६ कोटी, मेट्रो मार्ग क्रमांक १२ ची किमत ५८६५ कोटी रुपये आहे. या दोन्ही मार्गांच्या पूर्णत्वाची एकूण किंमत १० हजार ३४१ कोटी रुपये आहे. यामुळे सल्लागारांचे एकूण शुल्क या रकमेच्या २.६० टक्के आहे.


गायमुख ते शिवाजी चौक ९.२०९ किमीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४४७६ कोटी इतका असून, त्यावर गायमुख, गायमुख रेती बंदर, वर्सोवा चारफाटा, काशीमीरा, शिवाजी चौक ही स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई, बोरीवली, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड व ठाणे येथील नागरिकांना फायदा होणार आहे.


मेट्रो-१२ हा मेट्रो-५चा विस्तार असणार असून संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५८६५ कोटी इतका असून या मार्गात १७ स्टेशन्स असणार आहेत. यात एपीएमसी कल्याण, गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे.

Comments
Add Comment