मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘काँग्रेसमधून काँग्रेसवाले म्हणून येत नाहीत. ते त्यांच्या शिवसेनेत येत आहेत. ते शिवसैनिक होणार. ते उलट चांगले काम करत आहेत. एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाही, तर भाजपमध्ये येतील. जी काँग्रेस शिल्लक राहिलेली आहे, ती आम्ही वाटून घेऊ’, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधिश’ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्यासह पक्षातील आमदारांचा एक गट सरकारमधील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे. ‘काँग्रेस छोडो’ मोहीम भाजपकडून सुरू आहे का? या प्रश्नावर बोलताना नारायण राणे म्हणाले, भाजप थेट कृती करते. त्याचबरोबर शिल्लक राहिलेली काँग्रेस वाटून घेऊ, असे नारायण राणे म्हणाले.
चर्चेत मिळाला जुन्या आठवणींना उजाळा…
ही सदिच्छा भेट होती. जुन्या आठवणी निघाल्या. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही जनतेच्या मनातील भावना जागृत केली. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवे होते. लोकांच्या मनात जे होते, तो निर्णय आम्ही घेतला. बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. काँग्रेसचे नेते सरकारमध्ये येणार असल्याचे मला माहिती नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.