मुंबई : राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने कोरडे झालेले रस्ते पुन्हा वाहू लागलेत. मुंबई आणि उपनगरात पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत काल पुन्हा पावसाने राज्यात चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहेत. दादर, वरळी, प्रभादेवी, हाजीअली या परिसरात पहाटेपासूनच संततधार सुरू आहे. कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे.
रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे.