
“शंकर पुसे पार्वतीला | अगे गे पार्वती कांते ||
तुझ्या गे आवरणा कर | तुझ्या गे हरताळका कर ||
आवरणा कैशा कारण | हरताळका कैशा कारण ||
आवरणा पुत्रा कारण | हरताळका चुड्या कारण ||
शंकर गेले शिकारीला | लाविली माळा (मळा) निशाणी||”
अनुराधा परब
अगदी थोडक्यात या कोकणी लोकगीतामधून हरतालिका व्रत का करावं आणि पुत्र किंवा वंशासाठी कोणतं व्रत करावं, हे सांगितलं गेलं आहे. कोणत्याही प्रदेशाची संस्कृती अभ्यासत असताना स्थानिक लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकवाङ्मय - कथा, आख्यायिका, गीते यांचा धांडोळा अनिवार्य ठरतो. दक्षिण कोकणातही अशाप्रकारे लोकगीतांची प्राचीन परंपरा आहे. स्त्रीच्या दृष्टिकोनातून भौतिक, सामाजिक व्यवहार, सांस्कृतिक परंपरा, त्याच्याशी निगडित स्त्रीसुलभ भावनांचा आविष्कार यांतून होत असतो. कोकणातला गणेशोत्सव जसा वेगळा तसाच इथला गौरीचा सणही. या गौरीच्या निमित्ताने कोकणात एक वर्षाआड येणारी ओवशाची परंपरा हीसुद्धा प्रादेशिक सांस्कृतिक विशेषत: आहे. ओवसा / वोवसा / औसा या शब्दांच्या मुळाशी वसा, वारसा असे शब्द आहेत. नववधूंनी अखंड सौभाग्यासाठी तसंच सासरच्या चालीरिती, परंपरा, प्रथा, संस्कृती, यांचा स्वीकार करत तो पुढे नेण्याचा घेतलेला वसा असा याचा एक अर्थ आहे.
कुटुंबात लग्न होऊन आलेल्या मुलीला सून म्हणून, घरातील एक नवीन सदस्य म्हणून गौरीसमोर वंशात सामावून घेण्याची चालत आलेली परंपरा याही अर्थाने वसा शब्द येतो. या विविध अर्थांचा गौरीपूजनादिवशीचा व्रतविधी म्हणजे ओवसणे किंवा ओवाळणे असं म्हटलं जातं. ज्येष्ठा/पूर्वा नक्षत्रात ज्यादिवशी गौरीपूजन येत असेल, त्यादिवशी नवविवाहिता आणि ज्यांचा ओवसा लग्नानंतर वर्षभरात घ्यायचा राहून गेला आहे, अशी सौभाग्यवतीही ओवसा घेऊ शकते. हा ओवसा पाच किंवा दहा सुपांचा असतो. आदिमायेचं रूप असलेली गौरी हे निसर्गदेवतेचंच रूप. तिचं प्रतीक म्हणून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असलेले खडे किंवा सपुष्प वनस्पतींना गौरीरूपात पूजलं जातं. हिमालयाच्या दोन कन्यांपैकी ज्येष्ठ कन्या गंगा आणि दुसरी गौरी. गंगा या नावातच तिचा संबंध जलाशी असल्याचं कळतं. तिचे हे रूप ‘चतुर्वर्गचिंतामणी’ या ग्रंथातील व्रतखण्डामध्ये वारव्रत - तिथीव्रत - नक्षत्रव्रत म्हणून सांगितले गेले आहे. यात ज्येष्ठा नक्षत्राला केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठा कनिष्ठा पूजल्या जातात, असे म्हटले आहे. गौरीआवाहनाचा दिवस हा अनुराधा नक्षत्रावर तर पूजनाचा दिवस ज्येष्ठा नक्षत्राचा आणि विसर्जनादिवशी मूळ नक्षत्र असा त्या व्रताचा क्रम आहे.
द्वैधीतारा म्हणजेच खडे मांडून केल्या जाणाऱ्या पूजेविषयी ‘व्रतराज’ ग्रंथात पूजाभाग येतो, तर ‘निर्णयसिंधु’ ग्रंथामध्ये गौरीपूजन हे वार्क्क्ष अर्थात वृक्षस्वरूपात करावे, असे म्हटले आहे. यानुसार वृक्षरूपातील तेरड्याची गौर ही ‘तीन दिवस चालणारी’ या अर्थी ‘गौरी तीन दिवस येतात’ या संकेतातून धार्मिक संबंध जोडता येतो. सासुरवाणीशीने माहेरी थोडा काळ राहिल्यास नातेसंबंधांतील गोडवा टिकतो, या लोकधारणेचाही अस्पष्ट संदर्भ तिथे दिसतो. त्याचबरोबर सुखाच्या अशाश्वततेचे जीवनतत्त्वज्ञान सहजतेने सांगितले जाते.
महाभारताच्या आदिपर्वामध्ये वरुणस्य तथा गौर्याम्... यात गौरीला वरुणाची पत्नी म्हटले गेले आहे. वरुण जलदेव, तर पत्नी गौरी ही निसर्गदेवता या अर्थीही दोघेही पावसाशी, सृजनाशी संबंधित आहेत. पावसाळा ऋतूमध्ये या नक्षत्रांचे प्रतिमापूजन वृक्षरूपात करावे, असे हेमाद्रीनेही म्हटले आहे. थोडक्यात, तेरड्याची किंवा खड्यांची गौर असो तिचे पूजन कधी, कसे करावे याचे संकेत हे ठरलेले आहेत. शिवाय हळद, आघाडा आणि तेरडा पावसाळ्यातच आढळतात.
सिंधुदुर्गामध्ये गौरीपूजनाच्या विधीमध्ये दोन मुख्य घटक आहेत, ते म्हणजे सूप आणि रोवळी. या दोन्ही गोष्टी मांगल्य, पावित्र्य, सुबत्ता यांचे प्रतीक आहेत. शिवाय यांचा उपयोग विवाहविधी, बारसे या सृजन सोहळ्याच्या वेळी केला जातो. सूप हे धान्य पाखडण्यासाठी, चांगलं - कसदार ते राखून हिणकस टाकून देण्यासाठी तर रोवळी ही धान्य धुण्यासाठी वापरली जाते. सूप आणि रोवळी या दोन्ही वस्तू दैनंदिन वापरातल्या शिवाय सृजनाशी संबंधित असून शुद्धता आणि सात्त्विकतेशी त्यांचा संबंध जोडला जातो. याच रोवळीमध्ये घराकडून निघताना सिंधुदुर्गातील विवाहिता आघाडा, हळद आणि तेरडा यांची रोपे घेऊन जवळच्या पाणवठ्यावर जातात. तिथे या रोपांची पूजा करून गौरीला त्यात प्रवेशण्यास प्रार्थना करतात आणि सुपामध्ये ओवसा मांडून तो गौरीसमोर ओवाळतात, ओवसतात.
पाणवठ्यावर तेरड्याची मुळे रोवळीमध्ये धुतली जातात. तेरड्याची मुळे ही लक्ष्मीची पावले मानली जातात. गौरी पूजनाला हीच रोपे वापरण्या मागेदेखील औषधी कारणे आहेत तसेच या तीनही वनस्पती जमिनीवर आणि खाली पसरणाऱ्या आहेत. हळदीचे कंद जमिनीखाली, तर आघाड्याच्या काटेरी बिया तसेच तेरड्याच्याही बिया फुटून त्यांचे रुजवण वाऱ्याच्या साह्याने जमिनीवर होते. पर्यायाने ही रोपे सहज सर्जनाशी संबंधित सांगितली जातात. आघाडा खोकला, कावीळ इ. विकारांवर उपयुक्त तर हळद ही जंतुनाशक, स्वास्थ्यवर्धक तसेच गर्भाशयाच्या आजारांवर गुणकारी तर तेरड्याच्या बिया प्रसूतीसुलभतेसाठी वापरल्या जातात.
सारांश, गौरी ही निसर्गदेवता म्हणताना वृक्षांच्या रूपातले औषधी गुणधर्म आणि धार्मिक परंपरांचा इथे उत्तम समन्वय प्राचिनांनी साधलेला दिसतो. गौरीपूजनातील मुख्य सुबत्तेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून येणाऱ्या सुपात रानफुले, रानफळे, भाज्या जसे की, पडवळ, भेंडी, काकडी, दोडका, करांदे यांची पाने तसेच भाज्यांच्या फोडी आणि मध्यभागी पानाचा विडा नि नारळ ठेवला जातो. आपल्या परिसरातील गोष्टींचाच वापर धार्मिक कार्यात, विधीमध्ये करून निसर्गपरिचय, त्यातील औषधी गुणधर्मांची ओळख तसंच त्याचं संवर्धन करण्याचा पायंडा हा शतकानुशतके वसा म्हणूनच तर जोपासला जातो आहे. स्त्रियांच्या माध्यमातून याचा लाभ स्वाभाविकच तिला, तिच्या कुटुंबाला, वंशाला अखंड होण्याचा हा वारसा प्राचिनांनी रूजवण्यामध्ये किती दूरदर्शी विचार केला असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सूप घडविणाऱ्या कारागिरांचे अस्तित्व आधुनिक काळात नाहीसे होत चालले असले तरीही पूर्वी या कारागिरांना वर्षाकाठी बांबूने घडविलेल्या रोवळी, सुपासारख्या विविध वस्तूंच्या मोबदल्यात दिवाळीच्या सुमारास धान्यादी गोष्टी गावातून मिळत असत. गौरी पूजेतील विविध वनस्पतींपासून ते वस्तूंचा संबंध औषधी गुण तसेच सृजनात्मकतेबरोबरच जोडताना अजून एक संबंध अखंड सौभाग्याशीदेखील येतो. यासंबंधी येणाऱ्या कथाभागामध्ये दानवांच्या राज्यातील त्रस्त देवतास्त्रिया आपल्या.
सौभाग्यरक्षणाचे साकडे घालण्यासाठी एके दिवशी महालक्ष्मीजवळ गेल्या आणि त्यांनी तिची पूजा, प्रार्थना करत तिला प्रसन्न करून घेतले. देवतांच्या स्त्रियांचे गाऱ्हाणे महालक्ष्मीने ऐकून तिने भाद्रपद शुद्ध अष्टमीला दानवांचा संहार केला आणि स्त्रियांचे सौभाग्य अखंड राखले, अशी गौरीची कथा येते. कोकणातल्या गौरीपूजनाला अशा अनेक संकेतांचा, प्रतिमांचा संदर्भ वसा रूपात मिळालेला आहे. त्यामुळेच सिंधुदुर्गातील ओवसा केवळ प्रथा न राहता त्याचे रूपांतर पिढ्यान् पिढ्यांतून चालत आलेल्या सांस्कृतिक वारशात होते, हेच खरे.