मृणालिनी कुलकर्णी
पावसाचे थेंब तिरपे पडतात की सरळ? (विद्यार्थ्यांची भाषा, राहणीमान) हे महत्त्वाचे नाही, पाऊस पडायला हवा. (व्यक्त व्हा) आणि जमिनीत रुजायला हवा. (विकसित व्हा) मुक्त करते ते शिक्षण!
माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर जन्मदिवस. भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एक शिक्षक ते राष्ट्रपती असा त्यांचा प्रशंसनीय प्रवास! महात्मा फुलेंसहित अनेक नामवंतांनी शिक्षकी पेशा एका वेगळ्या उंचीवर नेला. त्या साऱ्यांना अभिवादन!
विसाव्या शतकात २१ अपेक्षित प्रश्नासाठी शिकायचे नि नंतर जगायचे असे होते! जगताना अनेक अंगावर येणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांसाठी विद्यार्थी तयार झालेलाच नव्हता. पाठ्यपुस्तकापलीकडे जग असते हेच माहीत नाही, तरीही शिक्षणसंस्काराने त्याला देशाचा चांगला नागरिक घडविले.
२१व्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मेंदूबरोबर जगाचा (गुगल) मेंदूही काम करीत असतो. जगात काय चाललंय? हे जाणून घेण्याची त्यांना इच्छा असते. आजचा विद्यार्थी पुढे जगाचा नागरिक होणार, भविष्यात शैक्षणिक देवघेवीसाठी आणि त्याला जागतिक स्तरावर संधी मिळावी म्हणून शिक्षकांना ‘थिंक ग्लोबली आणि अक्ट लोकली’ ही भूमिका घ्यावी लागेल.
देशाच्या, बालकाच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. आजचे बदललेले शैक्षणिक धोरण, समाजाकडून, पालकांकडून, संस्थाचालकांकडून, शिक्षकाप्रति अपेक्षा वाढल्या आहेत. या साऱ्यांनी हेही लक्षात घ्यावे. वर्गातील मुलांची संख्या, बहुसांस्कृतिक समाजातून आलेली भिन्न क्षमतेची मुले, अवांतर कामासहित मर्यादित वेळात ऑन व ऑफलाइनचा वापर करून त्यांचे बालपण जपत, आवड ओळखून त्याला आत्मविश्वासाने उभे करायचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. शिक्षकांनीही अंतर्मुख होऊन स्वतःचे आत्मपरीक्षण करावे नि नव्याने वाटचालीला सुरुवात करावी. ‘हॅपी टिचर्स डे’.
येणाऱ्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबरोबर त्याच्यातील कौशल्याचा विचार केला आहे. जेणेकरून तो उत्पादक कसा बनेल? शिक्षणात व्यवसाय कौशल्याचा झालेला प्रवेश (वर्क एज्युकेशन) हा बदल लक्षात घ्यावा. सर्व विषयांना समान दर्जा, सर्व स्तरावरील अभ्यासक्रम, मूलोद्योगाच्या धर्तीवर आधारित आहे. जागतिक कीर्तीचे डिझायनर प्रा. एझी तेझी म्हणतात, शालेय पातळीवर संशोधनात्मक प्रकल्पाचे अंतिम रूप उत्पादन असू शकते. उत्पादनाच्या डिझाइनपासून पॅकिंगपर्यंत येणाऱ्या नव्या नव्या कल्पना, मतभेद, परत सामंजस्याने काम करणे हे विद्यार्थीच करतील. यापुढे अनुत्तीर्ण / नापास या शब्दांना फाटा देत तो विद्यार्थी कौशल्यविकास अभ्यासक्रमास पात्र आहे, असा शेरा दिला जाईल. सहावीपासूनच व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने त्याचा आवडीच्या क्षमतेला पर्यायाने प्रत्येक मुलाला वाव मिळेल. हा शैक्षणिक बदल आनंददायी आहे, व्यापक आहे. मुलांच्या जीवनाला/आयुष्याला आकार देणारा, त्याला जगण्याचा अर्थ समजावणारा आहे.
प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याने शिक्षकांनी त्यांना एका तराजूत मापू नका. निःपक्षपातीपणे बालकांची स्वनिर्मिती, मते, विचार ऐकून मार्गदर्शन, प्रोत्साहन द्यावे. वर्षभराच्या साद-प्रतिसादातून, प्रतिक्रियेतून, रोजच्या हालचालींतून वकुबीने बालकाच्या नोंदी ठेवत विद्यार्थ्यांमधली दडलेली शक्ती शोधायला हवी. बाहेरच्या झगमगाटाचा काही उपयोग होत नाही. विद्यार्थ्यांच्या अंतरंगात दिवा लावण्यासाठी शिक्षकांनी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची तसेच कलाकार, खेळाडू, उद्योगपती यांचे जीवनपट दाखवावेत. शिक्षणाचा खरा अर्थ, ‘विद्यार्थ्यांमधील पोकळी शोधून भरून काढणे.’
पहिल्या दिवशी वर्गात मुलांची ओळख करून घेताना, प्रत्येक शिक्षकाकडून मार खात असलेल्या मारो महंमदला शिक्षकांनी जवळ घेत, प्रेमाने पाठीवरून हात फिरवत म्हणाले, “आजसे मै तुम्हे प्यारा महंमद कहेंगे!” तो म्हणाला, “आप मुझे मारोगे नही?” “नही!” त्यानंतर तो मुलगा आमूलाग्र बदलला. शिक्षकाचा हसरा प्रसन्न चेहरा, बोलताना वापरात येणारे आशावादी प्रेमळ शब्द मुलांवर परिणाम करतात.
लहान मुलांचे भावविश्व हे शिक्षकापासून सुरू होते आणि शिक्षकांपाशीच संपते. महाराष्ट्रातील अनेक शिक्षक प्रयोग, उपक्रम करून मुलाचे भावविश्व व्यापक करीत आहेत. हेरंब कुलकर्णी लिहितात, विकसन अभ्यास तंत्रामुळे गडचिरोलीच्या एका शाळेत चौथीत प्रत्येक आदिवासी मुलगा इंग्रजी छान वाचतो.
आज मूल गणिती सूत्रे शिकतो, पण त्यामागची तर्कसंगती समजत नाही, विज्ञानाचे नियम शिकतो, पण उपयोजन करता येत नाही. कविता शिकतो पण सौंदर्य कळत नाही. यामागे कृती, अनुभवाचा आभाव दिसतो. तसेच शाळेला मैदानच नाहीत, तर मुले खेळणार कोठे?
भा. रा. तांबेंची कविता शिकवून झाल्यानंतर कवीने सायंकाळचे वर्णन कसे केले त्याऐवजी शिक्षिकेने मुलांना आठवडाभर संध्याकाळी आकाशात बघून सायंकाळचे वर्णन लिहायला सांगितले. मुलांना अनुभव द्या. फास्ट फूडला पर्याय म्हणून एका शाळेत आरोग्यदायी सोप्या पाककृती मुलं स्वतः शिक्षक पालकांसमवेत करतात, प्रदर्शनही भरवितात.
यूट्यूबला मुले आकर्षिली जाऊ शकतात. त्यासाठी शिक्षकाला स्वतःचे शैक्षणिक साहित्य तयार करायला हवे. वर्गातील शैक्षणिक साहित्यातूनच ‘नॅशनल जिओग्राफी’ चॅनेल सुरू झाले. सर्वात प्रथम शिक्षकांनी आपणच माहितीचा दाता आहोत ही भूमिका बदला. आताचा प्रवास हा माहितीकडून ज्ञानाकडे, असा हवा. विषयाला चालना देण्यासाठी मुलांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त करावे. त्या माहितीवर मुलांनीच नवनिर्मितीची प्रक्रिया (इनोव्हेशन) करायची आहे. माहितीची रचना तयार करण्यासाठी, चर्चा प्रतिसादासाठी वर्गमित्र हवेत. या परस्परपूरक प्रक्रियेत इतरांचे ऐकण्याची सवय लागते. शिकवितानाचा संदर्भ जीवनाभिमुख असल्यास आकलन होते. पॉवर पॉइंट, वेगवेगळे अॅप्स वापरून शिक्षकांनी स्वतःचे ब्लॉग्स तयार करावेत.
संवाद आणि सादरीकरण हे शिक्षणाचे पर्यायाने शिक्षकाचे केंद्रस्थान आहे. परिसर विषय शिक्षकांनी ग्रुप केल्यास कामाचीही विभागणी होऊ शकते. करणाऱ्या शिक्षकाला खूप संधी आहेत. समाजात, विद्यार्थ्यात मान-सन्मान आहे. नवं नवं करण्यात, शिकून घेण्यात, मुलांना सहभागी करून कृतिशील अनुभव देताना, त्याच्या अडचणी जाणून घेताना, त्यांना जगण्यासाठी उभे करताना, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करताना शिक्षकच समृद्ध होत जातो. २१वे शतक “शिकता शिकता जगायचे आणि जगता जगता शिकायचे.” शिक्षक ही नोकरी न राहता त्यांचे करिअर होते, ही शिक्षकाची बदललेली भूमिका.