त्वं नो अस्या अमतेरूत क्षुधो अभिशस्तेरव स्पृधि ||
त्वं न उति तव चित्रया धिया शिक्षा शचिष्ठ गातुवित् ||
अदिती नातू
आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने विनोबाजींच्या शिक्षण विचार या पुस्तकातले त्यांचे लेखन प्रथम डोळ्यांसमोर येते. वेदात म्हटले आहे हे शचिष्ठ गातुवित्, हे श्रेष्ठ मार्गशोधका आमचं अज्ञान, आमची भूक, आमचे रोग दूर करण्याचा मार्ग तू आम्हाला दाखव. आम्हाला शिक्षण दे. तुझी बुद्धी, रक्षणशक्ती आणि विविध शक्ती तू प्रकट कर. या ठिकाणी शिक्षकाला गातुवुत् म्हणजे मार्ग शोधून काढणारा म्हणजे पाथफाईंडर म्हटले आहे. शिक्षकासाठी योजलेला वेदाचा हा खास शब्द आहे. गुरू हा अतिशय शक्तिशाली मार्गदर्शक आहे, असे वेद म्हणतात म्हणून तो कधीच दुबळा असू शकत नाही.
खरंतर भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्य परंपरेला एक महत्त्वाचे स्थान आहे. बदलत्या काळाप्रमाणे गुरुगृही राहून विद्या शिकणे अवघड झाले. म्हणून ही परंपरा शिक्षक-विद्यार्थी-शाळा यात परावर्तित झाली. पालक आणि शिक्षक यांच्या साथीने बालकाची जडणघडण होत गेली. त्यामुळे शालेय जीवनाच्या काळात आई-वडिलांच्या नंतरचे स्थान शिक्षकांचे राहिले.
शिक्षक पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर ते कसं जगावं हे शिकवतात. त्यासाठी शिक्षक कसा हवा, तर शिस्तबद्ध वागणारा, मुलांना समजून घेणारा, ज्ञानाप्रती आस्था असणारा, आचार-विचार अनुकरणीय असणारा, सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक देणारा. असा शिक्षक नक्कीच विद्यार्थीप्रिय असतो. कारण तो सर्वच विद्यार्थ्यांना आपलाच वाटतो. आज मागे वळून बघितले, तर अशा आपल्याला आवडणाऱ्या शिक्षकांची नावे पटकन आपल्या तोंडून बाहेर येतात. या शिक्षकांचे संस्कार नकळत विद्यार्थ्यांवर होत असतात. यातूनच भविष्यकाळासाठी समाजात जबाबदार पिढी निर्माण होत असते. तंत्रज्ञ, डॉक्टर, लेखक, कलाकार, वैज्ञानिक, पुढारी, प्राध्यापक या अनेक क्षेत्रातली दिग्गज मंडळी यातूनच तयार होतात. त्या प्रत्येकाच्या मनात शाळेतील काही शिक्षक नक्कीच येत असणार. मला वाटतं हाच शिक्षकाचा सर्वात मोठा गौरव आहे. विद्यार्थ्यांने आपल्या कर्तृत्वाने मोठे होण्याच्या काळात शिक्षकांची आठवण काढणे, रस्त्याने जाताना शिक्षक दिसल्यावर पाया पडणे यापेक्षा शिक्षकांना कुठल्याही मोठ्या पुरस्काराची गरज नसते.
आज या क्षेत्रातही अनेक बदल झाले आहेत. शिक्षणक्षेत्राला व्यावसायिक रूप आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील निर्मळ नाते लोप पावताना दिसते आहे. प्रशिक्षणाच्या काळात शिक्षकांशी बोलताना लक्षात यायचे, बाकी काहीच जमले नाही म्हणून शिक्षक झालेली संख्या खूप मोठी आहे. तेव्हा खूपच वाईट वाटायचं. पण, लक्षात आले हा त्यांचा दोष नाही, तर व्यवस्थेचा दोष आहे. B Ed, D Ed करून बाहेर पडलेले, शिक्षक होण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी आपण काहीतरी करून दाखवू, या इच्छेने कामाला सुरुवात करतात. पण शाळेत आधीपासून असलेल्या शिक्षकांचे वागणे, शिकवणे बघून त्यांच्यात नकारात्मकता येते आणि त्यांची इच्छाशक्ती संपते. पण त्यातून तावून-सुलाखून जे बाहेर पडतात, जे आपली जिद्द सोडत नाहीत ते इतर शिक्षकांना बदलतात. आपल्याला अशा शिक्षकांची गरज आहे, तेच व्यवस्थेत बदल घडवून आणू शकतात. आज अशा अनेक उपक्रमशील शिक्षकांचे गट आहेत, ते मीडियाच्या माध्यमातून आपले विचार एकमेकांना कळवतात. आज शिक्षक अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. शिक्षकाच्या बदल्या, अनेक ठिकाणची बोली भाषा शिक्षकांना अवगत नसणे, दुर्गम भागात पोहोचण्याची यातायात, अशैक्षणिक कामांचे ओझे यामध्ये शिक्षकाची कसोटी लागत आहे. त्यामुळे मुलांबरोबर काम करण्याचा वेळ कमी होतो आहे. काम करण्याची इच्छा मरते आहे. त्यामुळे व्यवस्थेत बदल झाला, तर शिक्षकांचे अनेक प्रश्न सुटू शकतील. नव्याने येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा गांभीर्याने विचार करत आहे. शिक्षकांची पात्रता वाढवण्यास मदत करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे, प्रत्येक शिक्षकाचे मूल्यमापन, त्यांना आवश्यक तंत्रज्ञानाची मदत पुरवणे, अशा अनेक मुद्द्यांवर त्यामध्ये विचार झालेला दिसतो. त्याचबरोबर डी एड, बीएडचे जुने अभ्यासक्रम बदलणार याचा संकेत त्यामध्ये आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम पुढील काळात नक्कीच दिसून येईल; परंतु कोणी तरी येऊन आपली परिस्थिती बदलेल याची वाट न बघता शिक्षकाने स्वतःपासून विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या पेशाप्रती प्रामाणिक राहून त्याने हे काम केले पाहिजे.
एक मजेदार उदाहरण विनोबा देतात, एक शिक्षक नोकरी करण्यासाठी त्यांच्याकडे येतो. विनोबा विचारतात, तुम्ही काय करू शकता? ते म्हणतात, मी शिकवू शकतो. मग विनोबा विचारतात, तुम्ही शेती कशी करायची, हे शिकवाल का? कपडे कसे धुवायचे हे शिकवाल का? स्वयंपाक कसा करायचा, हे शिकवाल का? अशा प्रश्नाचे त्यांचे उत्तर नाही मी शिकवू शकेन हे असते. त्यामुळे शिकवणे म्हणजे नक्की काय, याचा विचार शिक्षकांनी गांभीर्याने करायला हवा. आताच्या युगात माहितीचा सागर उसळला आहे. त्या माहितीचा योग्य वेळी, योग्य वापर अतिशय तर्कशुद्धपणे कसा करायचा, याचे मार्गदर्शन पुढच्या पिढीला करण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षकाला आपली भूमिका बदलावी लागणार आहे. सुरुवातीला आपण वाचलेल्या वेदातील शिक्षकासारखा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची पुढच्या काळात गरज भासणार आहे.
असं म्हणतात की, शिक्षण हे प्रवाही असायला हवेत, त्याचप्रमाणे त्या प्रवाहात सामावून जाईल, सहभागी होईल, असा शिक्षक असायला हवा. आजच्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून प्रत्येक शिक्षकाने कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवला आणि पुढील कालासाठीचे विद्यार्थी तयार करण्याचे स्वप्न बघितले, तर खऱ्या अर्थाने शिक्षक ते राष्ट्रपती हा प्रवास केलेल्या राधाकृष्णन यांना वाहिलेली ती आदरांजली असेल.