Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजशरीराची मॅक्रो / मायक्रो मॅनेजमेंट

शरीराची मॅक्रो / मायक्रो मॅनेजमेंट

डॉ. लीना राजवाडे

वाचकहो, मागील लेखात आपण पाहिले की, आपले शरीर हे मुख्य सहा अंगांमध्ये विभागलेले आहे. या सर्व अंगावयवांचा एकमेकाशी जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीराच्या कार्य प्रणालींसाठी संबंध असतो. त्यामुळे त्यांचे संतुलन सांभाळणे महत्त्वाचे आहे.

आजच्या लेखात या शरीराविषयी अधिक विस्ताराने स्थूल आणि सूक्ष्म शरीर अंग विभाग जाणून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी सूक्ष्मदर्शकाची (microscope) गरज नाही. भारतीय वैद्यक संहितामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने शवविच्छेदन करून सर्व शरीरातील महत्त्वाचे अंगावयव नावासकट निश्चित नोंदवले आहेत. शल्यचिकित्सा एवढेच नव्हे तर उर्ध्वांग, शालाक्य अशा शाखांना तर हे शरीर ज्ञान आवश्यक असतेच. पण त्याचबरोबर general physician ला देखील ते ज्ञान असणे आवश्यक असते. हे याचबरोबर या लेखातून हे अधिक सांगण्याचे प्रयोजन आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीची गुगल वर माहिती घेतो. तेव्हा ही माहिती आपण वैद्यक क्षेत्राशी संलग्न नसतानाही घेतो, तेव्हा माणूस म्हणून तशीच ही भारतीय वैद्यकशास्त्रातील शास्त्रीय माहिती प्रत्येकाला असायला हवी.

स्थूल शरीर अवयव – (ठळकपणे स्पष्ट, मोठे सहज दिसणारे) त्वचा आणि अस्थी किंवा हाडे सगळ्यात महत्त्वाचा शरीराला आकार आणि स्थैर्य देणारा अंग विभाग होय.

मुख्य त्वचा ६ आहेत. शरीरात मोठी छोटी मिळून ३६० अस्थी किंवा हाडे आहेत.
पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेन्द्रिये आहेत.

त्वचा, जीभ, नाक, डोळे, कान ही पाच ज्ञानेन्द्रिये आहेत.
हात, पाय, गुद, जननेन्द्रिय, जिव्हा ही पाच कर्मेन्द्रिये आहेत.
शक्ती देणारी ऊर्जास्थाने दहा – मुख्य ठिकाणे आहेत. मूर्धा, कंठ, हृदय, नाभी, गुद, बस्ति, ओज, शुक्र, रक्त, मांस.

कोष्ठात पंधरा अवयव आहेत
नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, बस्ती, पुरीषाधार, आमाशय, पक्वाशय, आतडे, गुद. प्रत्यंगे ६५ आहेत. उदाहरणार्थ डोळा या अवयवाशी निगडित भिवई, पापण्या ही प्रत्यंगे आहेत.
मोठी छिद्रे ९ आहेत. ७ डोक्यात आहेत. २ शरीराच्या खालील भागात आहेत.
स्नायू, शिरा, धमणी, पेशी, मर्म, संधी, केस, रोम यांची ही निश्चित संख्या आहे.

सूक्ष्म शरीर अवयव – (सहज न दिसणारे किंवा जाणवणारे) एवढेच नव्हे, प्रत्येक शरीरात आपापल्या ओंजळी प्रमाणात रक्त वगैरे गोष्टी किती असतात हे देखील सांगितले आहे. यात रक्त हे ४.५ ते ५.५ लिटर (८ ओंजळी) असते.

पार्थिव इत्यादी पांचभौतिक भेदाने देखील शरीरावयव समजून घेता येतात, असेही सांगितले आहे. स्थिर, जड, कठीण असे पृथ्वी महाभूत प्रधान अवयव नखे, केस. रक्त, मूत्र हे जल प्रधान, देहोष्मा, दृष्टी तेज प्रधान, श्वास उच्छवास वायु तत्व प्रधान, सर्व छोट्या मोठ्या पोकळ्यातील शब्द ध्वनी कानातील आवाज हे आकाश तत्व प्रधान असेही अवयवाचे वर्गीकरण आहे.

परमाणू भेदाने शरीर अवयव असंख्य होतात. याचा विचार सूक्ष्म किंवा अति सूक्ष्म शरीर रचनेशीच आहे. सुश्रुत संहितेत शरीर अवयवाची उत्पत्ती मुळात कसे तयार होतात, हा सूक्ष्म शरीर विचार नमूद केला आहे. गर्भावस्थेत रक्तापासून बरेच अवयव तयार होतात. यकृत, प्लीहा फुफ्फुसे हे त्यापैकी महत्त्वाचे आहेत. मेदातील स्नेहापासून स्नायू, शिरा तयार होतात. किडनी रक्त आणि मेदाच्या प्रसादभूत भागापासून तयार होतात.

हे सगळे बुद्धीपूर्वक विचारानी समजून घेतले पाहिजे. मुळात सजीव शरीरात, म्हणजेच जिवंतपणी आपल्या शरीराकडून होणारी प्रत्येक हालचाल किंवा कृती ही नीट चालवण्यासाठी या अवयवाविषयी मी सांगितलेली ही एवढी तरी कमीत कमी माहिती आपल्याला असायला हवी. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:च्या शरीराविषयी आपण जागरूक होऊ शकतो. शरीराला गृहीत धरणार नाही. काही गोष्टी माहिती असतात, पण त्याकडे अजून बारकाईने बघण्याची सवय लावून घेऊ. जसे की मी लिहिल्याप्रमाणे हात-पाय ही कर्मेन्द्रिय आहेत. तेव्हा कोणतेही काम जसे की जेवणे, वस्तू उचलणे, वस्तू धरणे, चालणे इत्यादी करताना घाई-गडबड न करता काळजीपूर्वक, हात-पाय वापरण्याचा आपण प्रयत्न करू. पायावर संपूर्ण शरीराचा भार सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळे पायातील स्नायूची ताकद चांगली ठेवण्यासाठी नियमित तेल पायाला लावणे, योग्य व्यायाम करणे यासारख्या चांगल्या सवयी अंगी बाळगण्याचा प्रयत्न करू.

कोष्ठातील अवयव यकृत, प्लीहा इत्यादी हे आतल्या बाजूला असणारे, मृदू अवयव आहेत. रक्तापासून हे अवयव खरं तर तयार होतात. त्यामुळे रक्त चांगले राहावे यासाठी सकस अन्न योग्य खाणे महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवू. एकूणच शरीराच्या उपकारासाठी, खरंच आपण त्यावर प्रेम करू.

सारांश, शरीर हे निसर्गतः आपल्याला मिळते, पण त्याची योग्य काळजी आपण घेतली, तर आरोग्याचा मार्ग सुकर होईल. रक्ताविषयी अधिक जाणून घेऊ पुढील लेखात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -