रमेश तांबे
एकदा काय झालं. खूप पाऊस पडला. साऱ्या रानावनात पाणीच पाणी झालं. ओढे, नाले तुडूंब झाले. नद्यांना पूर आले. काही झाडे पडली. काहींच्या फांद्या गेल्या तुटून. पक्षी आडोशाला गेले, तर प्राणी डोंगरकपारीत! साप, विंचू बिळातले प्राणी सैरावैरा धावत सुटले. त्यांना उरले नाही भान कसले!
अशा या जंगलात एक वाघ राहत होता. तो खूपच होता बलदंड. साऱ्या जंगलात त्याच्या डरकाळीचा सूर घुमायचा. सारे प्राणी त्याला घाबरायचे. तो येताच लपून बसायचे! पण गेले चार दिवस धुवांधार पाऊस होता पडत. जंगलात त्यावेळी वेगळेच काही घडत होते. सारे जंगल पाण्यात बुडाले. सारे प्राणी वाघाच्या गुहेपुढे उभे राहिले. दोन दिवस वाघ गुहेतच होता. जंगलात काय चाललंय याचा त्याला पत्ताच नव्हता. दोन दिवसांनी वाघ झोपेतून जागा झाला. डोळे चोळतच उठला. त्याला खूपच भूक लागली होती. त्याने चार पाय लांब केले. जबडा उघडून तोंड साफ केले. मग जोरदार फोडली एक डरकाळी. तशी ऐकू आली एक किंकाळी. वाघाला वाटले कुणाचा हा आवाज. तसा वाघ सावध झाला. दबकत दबकत गुहेच्या बाहेर आला. बघतो तर काय हजारो प्राणी, बघत होते त्याच्याकडे दीनवाणी. ससे, लांडगे, कोल्हे, हरणे, हत्ती, गेंडे सारेच होते. त्यांना बघून वाघाच्या तोंडाला सुटले पाणी. त्याला वाटले वर्षभराचे जेवण सुटले!
तेवढ्यात ससा म्हणाला, “वाघा वाघा हवं तर मला खा. पण साऱ्या प्राण्यांना गुहेत घे. खूप पाऊस पडलाय. जंगल सारं पाण्यात बुडलंय. जंगलात काहीतरी विचित्र घडलंय.” वाघाने दूरवर पाहिलं तर त्याला सगळीकडे पाणीच पाणी दिसलं! मग कोल्हा पुढे आला. अन् वाघाला कळवळून म्हणाला, “वाघोबा कसला विचार करताय. हवं तर मला मारा. पण साऱ्या प्राण्यांना आसरा द्या.” वाघाला सशा-कोल्ह्याचं कौतुक वाटलं. साऱ्यांना मदत व्हावी म्हणून दोघे मरायला तयार झाले होते.
मग वाघ झाला तयार. म्हणाला, “साऱ्यांनी या माझ्या गुहेत. राहा तिथं दोन दिवस मजेत. मी तुम्हाला खाणार नाही. तुमच्यासोबतच उपवास करीन. पण जंगलचा कायदा पाळायचा. कुणीच कुणाला त्रास नाही द्यायचा. जो कायदा मोडेल तो शिक्षा भोगेल.” मग सारे प्राणी गुहेत शिरले. वाघाच्या घरात जाऊन बसले. दोन-तीन दिवस कुणीच नाही खाल्ले. सारेच उपाशी राहिले. सगळ्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले!
चार दिवसांत पाणी ओसरले. सगळे प्राणी गुहेच्या बाहेर पडले. सगळ्यांनी वाघाचे आभार मानले. पण एक लांडगा राहिला गुहेतच झोपून. कुणी तरी त्याला पाहिले लांबून. मग कोल्हा गेला उड्या मारीत. लांडग्याला हलविले शेपटी मारीत. खरे तर लांडगा झोपलाच नव्हता. तो झोपेचे नाटक करीत होता. कोल्हा बेसावध असतानाच लांडग्याने मारली त्याच्यावर झडप. लांडग्याने पकडताच मान, कोल्हा ओरडला जोरात. आवाज ऐकून वाघ गुहेत धावला. लांडग्याच्या तोंडावर एकच फटका मारला. कोल्हा निसटून गेला पळून. आता मात्र वाघाचे डोळे झाले लाललाल. तो रागातच लांडग्याला म्हणाला, “तू जंगलचे नियम तोडलेस. संकटाच्या वेळी भूक विसरायची. सगळ्या प्राण्यांना मदत करायची. हाच आहे आपला कायदा. म्हणून मी तुम्हा साऱ्यांना माझ्या घरात दिला आसरा. पण तू त्याचा गैरफायदा घेतलास. तुला शिक्षा मिळालीच पाहिजे.” असे म्हणत त्याने भीतीने थरथरणाऱ्या लांडग्यावर मारली झडप. लांडग्याचा गळा वाघाच्या तोंडात. लांडग्याने झाडले हातपाय जोरात. मग थोड्याच वेळात त्याचे प्राण गेले. तेव्हाच वाघाने लांडग्याला सोडले. मग वाघ जोरदार डरकाळी फोडून म्हणाला, “लक्षात ठेवा जंगलचा कायदा जो मोडेल, त्याला शिक्षा हमखास मिळेल!”