विरार (प्रतिनिधी) : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने अनेक उपक्रम सध्या राबविले जात आहेत. वसईतील गिरीज येथील तरुण राहुल विन्सेन्ट डिसिल्व्हा या ३० वर्षीय तरुणाने ही अमृत मोहोत्सवानिमित्ताने प्रदूषण विरहित भारतचा नारा देत देशातील २६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात जनजागृतीसाठी २३८४७ किलोमीटरचा प्रवास केला.
१७ जानेवारी २०२२ ला त्याने आपल्या या मोहिमेची सुरुवात केली होती. १७४ दिवसाचा प्रवास करून ती मोहीम १० ऑगस्ट २०२२ ला संपली. नुसते खाणे पिणे आणि मौज मज्या करण्या ऐवजी ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाची संस्कृती, त्याचे सृष्टी सौंदर्य, तेथील वेगवेगळे रिती रिवाज, तेथील लोकांशी संवाद साधावा आणि प्रदूषणा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राहुलने मोटरसायकल वरून ही भ्रमंती सुरु केली होती. त्याच्या या भ्रमंतीत त्याने अनेक हिंदू मंदिरे, बौध्द विहार, स्तूप, मशिदी, चर्चेस, गोल्डन टेम्पल यांना भेटी दिल्या. या भेटीत त्याला अनेक अनुभवही आले. कधी तो पेट्रोल पम्पवर झोपला तर कधी त्याला मेघालयातील मॅकमिलन या हॉटेल मालकाने ६ दिवस मोफत राहण्याची सोय केली. तर मणिपूरला पूल तुटल्यामुळे त्याचा पुढे जाण्याचा मार्ग खंडीत झाल्याने तेथील एका कुटुंबाने त्याच्या राहण्याची सोय केली होती. फोटोग्राफीची आवड असल्याने आणि एका कंपनीत फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याने राहुलने या संपूर्ण दौऱ्यात आपला फोटोग्राफीचा छंद ही पूर्ण केला.
प्रदूषण विरोधात जनजागृती करण्यासाठी भारत भ्रमण करणाऱ्या राहुलला अनेक ठिकाणी चांगले अनुभव ही आले. तामिळनाडू मध्ये त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच स्वागत त्याला उत्तरप्रदेश, बिहार येथेही त्याला अनुभवयाला आली. सम्पूर्ण भारत भ्रमणात त्याला आपल्या सैनिकांनी चांगले सहकार्य केले. काहींनी त्याच्या बरोबर फोटो काढले तर काहींनी त्याला रस्त्यात गाईड ही केले. हा वेगळा अनुभव हा त्याला मिळाला. यूपी, बिहारच्या लोकांचा आंध्र प्रदेशमध्ये सुखद अनुभव आला. आंध्र प्रदेशमध्ये भाषेची अडचण उभी राहिल्यावर तेथील यूपी, बिहारचे लोक मदतीला आल्याचे राहुलने आवर्जून सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने प्रदूषण विरहित भारतासाठी जनजागृतीचे माझे स्वप्न पूर्ण झाले, असे राहुल ने प्रहारशी बोलताना सांगितले. या सर्व भ्रमंतीत त्याला २ लाख ३०,००० हजार रुपयांचा खर्च आला. त्यातील ५६ हजार रुपये हे पेट्रोलवर खर्च झाल्याचे त्याने सांगितले.
या पुढे देखील आपण पुन्हा एकदा भारत भ्रमणावर जाणार असल्याचे त्याने सांगितले. आपल्या देशात असलेली अखंडतेतील एकता आणि सृष्टी सौंदर्य इतर कुठेच नसल्याचे त्याने आवर्जून सांगितले. तरुणांनी फक्त पिकनीसाठी न जातात देशातील लोक, त्यांचे रितिरिवाज, त्यांचे सण, एकदा बघावेत असे आवाहन ही त्याने तरुणांना केले आहे.