
सतीश पाटणकर
रत्नागिरी पट्ट्यातील दालदी समाजाची स्वत:ची अशी आगळी खाद्यसंस्कृती आहे. माशांचे वैविध्यपूर्ण पदार्थ ही तर त्यांची खासीयतच. रत्नागिरीच्या खाडीपट्टीच्या प्रदेशातील दालदी मुस्लिमांच्या मासेमारीच्या धंद्यामुळे या लोकांची एक आगळीच खाद्यसंस्कृती जन्माला आली. त्यांचे लजीज पदार्थ आपल्या समाजापासून वंचित आहेत. या पदार्थाची किंमतही नाममात्र असते. या स्त्रिया अल्पबचत गट, सरकारी योजना आदींपासून कोसो दूर आहेत. कोकणच्या खाद्यमहोत्सवात यांना कधी कुणी स्टॉल दिला नाही. यांनीही कधी मागितला नाही. सरकारची मेहेरनजर यांच्यावर कधी पडली नाही. सरकार कधी पोहोचेल तेव्हा पोहोचेल, पण पावभाजी-पिझ्झाला चटावलेली आमची जीभ तरी पांढऱ्याशुभ्र सान्नीचा, केशरी साखरोळीचा, नारळी सालनाचा, खुसखुशीत खजुरीचा, जाळीदार भाकुरच्याचा आणि दालगोशचा आस्वाद घ्यायला पुढे येईल का? हा खरा प्रश्न आहे.
निसर्गाने प्रत्येकाची ‘रसना’ वेगळी बनवली आहे. या चंचल जिभेच्या मागणीनुसार प्रत्येक ठिकाणची वेगळी खाद्यसंस्कृती उदयाला आली आहे. अर्थात या साऱ्यात भौगोलिक परिसरानेही आपला वाटा उचलला आहे. जिथे जे पिकतं, त्याचे निरनिराळ्या चवीढवीचे अनंत खाद्यप्रकार त्या-त्या ठिकाणी अस्तित्वात आले. माणसाचा व्यवसाय, ज्ञान आणि प्रदेश या गोष्टी त्याच्या भाषेचं आणि आहाराचं स्वरूप निश्चित करत असतात.
इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात जे अरब लोक भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन स्थायिक झाले, त्यांचे हे वंशज. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कितीतरी पारशी शब्द सहज आढळतात. खमीर (आंबवण), रिक्ताबी (बशी), डेग (मोठं पातेलं) हे आणि यासारखे अनेक पारशी शब्द त्यांच्या बोलण्यात येतात. लुंगी, शर्ट, डोक्यावर गोल टोपी हा दालदी पुरुषांचा पेहेराव. तर पाचवारी, ‘संवार साडी, डोईवर पदर हा दालदी स्त्रीचा वेष. कोकण किनारपट्टीतील वास्तव्यामुळे भात, मासे आणि नारळ यांचे प्रमाण जेवणात मुबलक. लग्नकार्य, सणासमारंभात दालदी लोकांचं जेवण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतं. या जेवणात पुढील चार प्रमुख पदार्थ असतातच. सुकं मटण, वजरी आणि काळे वाटाणे घालून केलेली सुकी भाजी, फोडणीचा भात, नारळी सालना. कोणत्याही मंगलकार्य वा समारंभात ‘पोळी-चपाती-रोटी’ नसते.
मटणासाठी, भाजीसाठी लाल मसाला वापरतात. तो बाजारात कुठे मिळत नाही. खास त्यांचे त्यांनीच प्रमाण ठरवून केलेला हा मसाला पदार्थाला स्वाद व सुवास देतो. फोडणीच्या भातात अख्खा गरम मसाला व कांदा असतोच; वर आंबेमोहोराच्या पातीने त्याची लज्जत वाढवली जाते. सर्व जेवण चुलीवरच करतात. बिर्याणी, भात-पुलावासाठी तांब्याची कल्हई लावलेले डेग वापरतात. नारळी सालना म्हणजे मटणाची मुंडी नि पायाची हाडे घालून केलेला नारळाच्या दुधातला पातळ रस्सा. ‘दालगोश’ हा पदार्थ मेहंदीच्या दिवशी करून खाण्याची पद्धत त्यांच्यात आहे. तूर, मसूर, चणाडाळीत हे लोक मटण शिजवतात आणि त्यात नारळाचं दूधही आवडीप्रमाणं घालतात. भातात मटण घालून ‘अकनी’ बनते. मटणाच्या सोरव्यात (ग्रेव्ही) तांदूळ टाकून दम दिला जातो. कुचुंबर (कोशिंबीर), पापड, लोणचं याबरोबर तो खातात. डाव्या बाजूला आंबोस्तीचे मुरब्बो (आंबोशीचे तिखट-गोड लोणचे) कधी क्वचित, विशेषत: पावसाळ्यात पानाच्या डाव्या बाजूला असतो. मासेमारी हा मुख्य धंदा असल्यामुळे अनंत प्रकारचा समुद्राहार त्यांच्या खाण्यात असतोच.
‘कांटा’ आणि ‘गोडवले’ हे माशाचे प्रकार फक्त रत्नागिरी खाडीपट्ट्यातच मिळतात. त्यांचं ओलं वाटण लावून कालवण करतात. सुक्या वाटणाचे चमचमीत गोडवलेही केले जातात. गर्भार स्त्रीला आणि आजाऱ्याला ‘गोडवले’ व ‘काचका’ खास बनवून देतात. रत्नागिरी खाडीपट्ट्याच्या राजीवडा, कर्ला भागात ‘तसरी मुळे’ प्रचंड प्रमाणात मिळतात. कधी मुळ्यांत, तर कधी वाकुंड्यांत अनेकांना ‘मोती’ही मिळतो. त्याला सोन्याच्या नजाकतीत बसवून दालदी स्त्रिया ‘फुल्ली’ बनवून आपल्या नाकाची शोभा वाढवतात.
पावसाळ्यात मासेमारी बंद असते तेव्हा सुक्या माशांवरच या मंडळींचे जेवण चालते. डाळ-भात हा तिन्ही ऋतूंत तिन्ही त्रिकाळ असतोच. मात्र पावसाळ्यात सुक्या माशाचा ‘सालना’ जोडीला असते. सुक्या गोळीमांची (बारीक कोळंबी) चटणी, पातळ रस्साही बनवला जातो. चक्क पोह्यांसारखी भाजून कांदा, मिरची, लिंबू, कोथिंबीर घालून भेळ-चिवड्यासारखीही खाल्ली जाते. आंबाड किंवा काडीचं बटाटा घालून ‘सुकं आंबाड’ केलं जातं.
बारीक कोळंबी तर कोणत्याही शाकाहारी भाजीत घालूनही खाल्ली जाते. सोडे असेच तळून, वांग्याच्या भाजीत घालून खातातच; पण कोथिंबीर, लसूण, भाजकं सुकं खोबरं, लाल मिरची आणि भाजलेले सोडे पाट्यावर जाडसर वाटून केलेली ‘सोड्याची चटणी’ फारच आवडीनं गट्टम् केली जाते. सुकवलेले मुळे भाजीतही घालतात. तळलेल्या कांद्याला दालदी स्त्रिया ‘बिरिस्ता’ म्हणतात. तो बिरिस्ता घालून माशाचा पुलाव बनवतात. या खास कोकणी पुलावात दही व टोमॅटोही घातले जातात. ‘दम’ काढून केलेला हा पुलाव लज्जतदार म्हणून ख्याती मिळवून आहे. कालवं, वाकुंड्यांची बिर्याणीही या कोकणी मंडळींची खासीयत आहे. म्हावऱ्याचे कबाब हे लहान-थोरांची मेजवानीच असते. सुरमई, गेदर, बांगडा, ढोमा या माशांचे कबाब बनवले जातात. ‘मुळ्याची कढी’ हा असाच एक वेगळा प्रकार. एक शेर मुळ्याला दोन कांदे, मिरी, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, जिऱ्याचं वाटण लावायचं. त्यात दही घुसळून घालून ही कढी बनवतात. आवडीनुसार त्यात बटाटाही घालतात. त्यांचे लजीज पदार्थ आपल्यापासून वंचित आहेत. या पदार्थाची किंमतही नाममात्र असते. या स्त्रिया अल्पबचत गट, सरकारी योजना आदींपासून कोसो दूर आहेत.