Thursday, May 22, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

आरे दूध वाचविण्यासाठी संघटना एकवटल्या

आरे दूध वाचविण्यासाठी संघटना एकवटल्या

मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे मुंबईत गोकुळ, वारणा, कात्रजसारखी दूध पुरवठा कंपन्या नफ्यात असताना, आरे दूध मात्र नुकसान झेलत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे मुंबई दूध योजनेची दुरवस्था झाली आहे. आरे दूध केंद्र, महापालिका, शासकीय संस्था, रुग्णालय यांचा आरे दुधाचा बंद झालेला पुरवठा, कुर्ला डेअरी व वरळी डेअरी पूर्णतः बंद झाल्याने संपूर्ण मुंबईचे दूध वितरण अडचणीत सापडले आहे.


आरे दुग्ध शाळेला वाचवून मुंबई दूध योजना सक्षम करण्याकरिता कामगारांच्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, वितरकांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्र येत आरे दुग्धशाळा बचाव समितीची स्थापना केली. भारतीय कामगार सेना, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघ, महाराष्ट्र दूध वितरक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण दूध वितरक सेना अशा १५ संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.


आरे दुग्धशाळा ही पुरातन व मध्यवर्ती केंद्र असून येथून मुंबईभरचा दूध पुरवठा होतो. आता मात्र तिची दुरवस्था झाली असून ते बंद होण्याच्या मार्गावर आहे. कामगार व वितरक यांना दैनंदिन अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आरे दूध वितरण बंद झाल्यामुळे आरे स्टॉलधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. मुंबईकरांना चढ्या दराने दूध विकत घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टींवर उपाययोजना करण्याकरिता व मुंबई दूध योजना सक्षम करण्याकरिता कामगारांच्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, वितरकांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची नुकतीच संयुक्त बैठक वरळी दुग्धशाळा येथे झाली.

Comments
Add Comment