माधवी घारपुरे
आमच्या सुखासमोर दुसऱ्याच्या दु:खाची किंमतच आम्हाला वाटत नाही, हेच खरं आहे. आमच्या सुखात आम्ही किती चूर झालेलो असतो!
‘निज दु:ख रजसम गिरीसम जावा’
या उक्तीप्रमाणे छोट्याशा दु:खालाही कवटाळून बसतो. आता हेच बघा ना! मला परस्पर फाेन करून अशोक पाचगणीला गेला. मग मी काय कमी! माझा अपमानच ना हा! मी पण निरोप ठेवला आणि आले माहेरी कोल्हापूरला. घरातले सगळे नाटकाला गेले होते. मी सरळ रिक्षा केली आणि माझ्या आवडत्या ठिकाणी रंकाळ्यावर येऊन बसले. गार वारा होता. रंकाळा काठोकाठ भरला होता. माझं मन बऱ्यापैकी शांत झालं. यांचा फोनही आला. पण मी उचलला नाही. यांनाही कळू दे की, दुसऱ्यालाही मन असते ते! आपली चूक कळली म्हणूनच फोन केला असेल ना. एक खरं की, माझा ‘स्व’ कुठेतरी सुखावला नक्की! आनंदाची परिभाषाच लगेच बदलली. प्रत्येक गोष्टीत आनंद दिसायला लागला.
समोरच गजरेवाली आली. हीच थोड्या वेळापूर्वी दिसली. अाशेने माझ्याकडे पाहत होती, पण हातानेच तिला जायची खूण केली. आता जवळ बोलावून दोन गजरे घेतले आणि पर्समधून सुटे पैसे काढेपर्यंत ती म्हणाली, ‘ताई पैसे मिळाले ना!’
‘कुणी दिले’
‘हे काय, या ताईने दिले सगळ्यांचे’
मी मान वर करून पाहिले तर आठवणीत पुसट झालेला चेहरा समोर दिसला. बरोबर १० वर्षांचा मुलगा होता. मी म्हटलं ‘तुम्ही काय म्हणून पैसे दिले?’
‘मला ओळखलंत नाही बाई?’
‘चेहरा ओळखीचा वाटतोय पण नाव आठवत नाही. विद्यार्थिनीच आहेस पण किती सालची बॅच? तुम्ही मुलं मोठी झालात की ओळखत नाही गं!’
‘बाई मी तुमची रत्ना गोसावी. आता बीए झाले आणि LIC त क्लर्क म्हणून काम करते. हा माझा भाऊ रघुवीर. आता सहावीत आहे.’
‘माझा भाऊ सहा महिन्यांचा आहे असं सांगितलं होतंस तोच का हा भाऊ?’ घरचा संसार इथपर्यंत आणलास?
‘इतकंच नाही बाई, गेल्यावर्षी रेखाचं पण लग्न झालं. ती पण डी.एड. झाली. शाळेत नोकरी करते. होतकरू आणि गुणी मुलगा मिळालाय. हुंडा पण नाही घेतला आणि लग्न पण रजिस्टर केलं.’
रत्ना बोलत होती. तिला बसायला सांगेपर्यंत रघू म्हणाला, ‘ताई, भेळ खायला आणलेस ना?’
‘होय रे! बाई बसा हं. मी १० मिनिटांत याला भेळ खायला घालून आणते.’
‘जा जा सावकाश जा मी आहे इथे’
रत्ना पाठमोरी झाली आणि माझ्या आठवणी पण. रत्ना १०वीत असताना मी वर्गशिक्षिका होते. केस सदैव विस्कटलेले. कळकट, मळकट गणवेश. त्यालाही कसले कसले डाग असायचे. काही वेळा जवळ आली की, शू केलेल्या कपड्याचा वास येई. मुख्य म्हणजे रोज प्रार्थना झाल्यावर वर्गात कधी वेळेवर नाही. मी रागवायची. हजेरी लावणार नाही म्हणायची, पण उलट उत्तर कधी नाही. अभ्यासात तल्लख! म्हणून जादा बोलता पण यायचं नाही, पण गैरशिस्त मला पटणारी नव्हती. तिला बजावलं की आईला घेऊन ये पण पठ्ठीनं काही
ऐकलं नाही.
शेवटी मी चिठ्ठी दिली आणि पालकांची यावर सही आण म्हणून सांगितलं. ती पण दुसरे दिवशी आणली नाही म्हणून तिला वर्गाबाहेर उभं केलं. माझा तास झाला. मी बाहेर पडले. परत सातवा तास माझा होता म्हणून मी वर्गात गेले. मीच विचारलं, ‘इथे काय करतेस रत्ना?’
‘बाई तुम्ही सकाळी बाहेर काढलेत ना?’
‘अरे मुलगी ३ तास बाहेर, डबा पण नाही खाल्ला, मीच शरमले. मला ८वा तास आॅफ होता. तिला वर्गात आणले आिण आठव्या तासाला माझ्याबराेबर स्टाफरूममध्ये आणलं. तिला निर्वाणीचं सांगितलं, ‘रत्ना काय प्रकार आहे? मला खरं खरं आणि स्पष्ट सांग, काही लपवू नकोस.’
हे ऐकल्यावर तिचा बांध फुटला. तिच्या आसवांचा बहर अोसरल्यावर तिला पाणी दिलं, शांत केलं आणि म्हटलं, आता सारं सांग बरं!
‘बाई, नववीचा रिझल्ट लागला आणि माझी आई वारली. मला सातवीतली बहीण आहे आणि ६ महिन्यांचा पाळण्यातला भाऊ! आईला टायफाईड झाला. बाबा गवंडीकाम करतात. आईला हॉस्पिटलला ठेवायला पैसे नव्हते. कुणाची मदत नाही. तिचेच गळ्यातले गंथनातले मणी विकले, पण त्यावर काय होणार? शिवाय रघूला पण दूध नाही. डब्याचं दूध ४ महिन्यांच्या मुलाला पाजणं परवडणारं नव्हतं. शेवटी आईनं रघूला माझ्या हातात दिलं. वारस आहे, बाबाला हवा होता ना. आता सांभाळ. असं सांगून तिने डोळे मिटले. तीन पोरांच्या गरीब गवंड्याचं दुसरं लग्न तरी शक्य आहे का? बाई तुम्हीच सांगा. मी आई झाले. धुणी भांडी, स्वैपाकपाणी करायचं, रघूला बघायचं, यात दिवस जातो. रात्री ११ ते १ पर्यंत अभ्यास करून झोपते. सातवीतल्या रेखाची शाळा सकाळची. ती घरी आली की तिच्या ताब्यात या पोराला देते आणि शाळेत येते. म्हणून रोज उशीर होतो. त्यात श्ू-शी केलेली असते, पण कपडेही जास्तीचे नाहीत. मग मी तशीच शाळेत येते बाई! कुणाकुणाला हे सांगत बसू? बाई आता रागावणार नाही ना…?’
मी आतून पूर्ण हलले. तिला दिलासा दिला. वर्षभर जमेल ती सगळी सगळी मदत तिन्ही मुलांना केली. तिला मॅट्रिकला ६५ टक्के गुण मिळाले. आली, भेटली म्हणाली ‘बाई घरी शिकवण्या घेऊन १ वर्षाने बाहेरून बीएची परीक्षा
देणार आहे.’
‘खूप छान!’ मी म्हटलं
त्याच वर्षी मी निवृत्त झाले. त्यामुळे पुढे काही कळलं नाही आणि आताही रत्ना दत्त म्हणून समोर! भावाला भेळ खायला घालून रत्ना पुन्हा हसत हसत समोर आली. बाई रघू खूप हुशार आहे. बाबांना पण आता कायमचं काम मिळालंय. आता सुखच सुख आहे. मनात आलं ‘हे काय सुख?
‘बाई तुम्हाला रेखाचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवते हं!’