डॉ. विजया वाड
दुधाची पिशवी, वर्तमानपत्र… दोन्हीही दाराला लटकलेली!
सुलक्षणा दचकली. हर्ष अजून अंथरुणातच लोळत होता. त्याच्या हातात ताजं वृत्तपत्र होतं.
“उठायचं नाही का हर्ष?”
“वर्तमानपत्र वाचू दे ना. एकदा उठलो की वाघ पाठीमागे लागल्यासारखा दिवस सुरू होतो.”
“जरा ऊठ आणि शेजारी बघ.”
“सकाळी उठल्यावर नवऱ्याला गोड गोड काहीतरी द्यावं… किमानपक्षी चहा तरी द्यावा गं सुलू… शेजारच्या वासंतीबाईकडे पाठवू नको कृपाकरून! त्या चहा पिण्याच्या वाईट सवयीबद्दल सकाळच्या प्रहरी मला उपदेशामृत पाजत बसतील.”
“अरे त्यांच्या दाराला कालची दुधाची पिशवी आणि आजची दुधाची पिशवी तशीच लटकली आहे. शिवाय वृत्तपत्रंही दोन्ही दिवसांची तशीच सुरनळीबंद लटकलीयत.”
“काय सांगतेस काय सुलू तू? अगं त्यांची परवीन बाबी झाली की काय?”
“कसं रे बोलवतं तुला असं?”
“बी पॅक्टिकल सुलू.” तो अंगावरली चादर झटकून उठला.
“त्यांच्या घराला कुलूप नाही… पिशवी, पेपर बाहेर… चल बेल वाजवू.”
तो तरातरा बाहेर आला, तर कामवाली यशोदाबाई दरवाजातच उभी होती. हर्ष आणि सुलक्षणाला दरवाजात उभी बघून ती म्हणाली, “कवाधरून बेल मारून राह्यली मी, पन म्हातारी आवाज नाय देत.”
“तू काल आली होतीस?”
“काल माजी दांडी होती. म्हंजी शिक रजा होती.” यशोदा स्वत:चंच बोलणं सावरून घेत म्हणाली.
सुलक्षणाला अर्थातच यशोदाच्या बोलण्यात रस नव्हता. तिची दांडी असो की आजारपणाची रजा! यशोदा काही तिची कामवाली नव्हती.
“तू केव्हापासून वाजवतेयस बेल?”
“कवाधरून वाजवतेय. दारावर थपडा पन बडवून झाल्या. आजी दार उघडना झाल्यात. काय परवीन बाबी झाली का काय त्येची?”
हर्षप्रमाणेच यशोदेलाही वाटतंय… त्या परवीन बाबीसारख्या गेल्या…? सुलक्षणाच्या अंगावर एकदम काटा आला.
“यशोदा तू पंधरा नंबरमध्ये कामतांकडे पण करतेस ना काम? तिथं जा. वेळ पडली की बोलावते मी. मला विचारल्याशिवाय मात्र जाऊ नकोस.”
“ठीक आहे वैनी. येती मी.”
यशोदा पंधरा नंबरकडे नित्याचे काम करण्यासाठी वळली. सुलूच्या डोक्यात जोरात विचारचक्रं चालू झाली.
“हर्ष, आपण पोलिसांना बोलावूया का?” तिनं विचारलं.
“मला वाटतं आपण त्यांचा मुलगा शिवानंद आणि त्याची बायको यांना आधी फोन करूया. ही जबाबदारी त्यांची नाही का?”
“तू म्हणतोस ते बरोबर आहे.” सुलक्षणाला आपल्या नवऱ्याचे म्हणणे पूर्णपणे पटले.
वासंतीबाई आता ब्याऐंशी वर्षांच्या झाल्या होत्या. एकट्या टुकीने राहत होत्या. शिवानंद आणि साधना इथेच रिक्षाने गेलं, तर पंधरा मिनिटांच्या अंतरावर राहत होती.
“आम्ही थोडंच त्यांना म्हणतो एकटं राहा म्हणून? त्यांनाच स्वातंत्र्य जपण्याची हौस! आमच्या घरी आल्यावर माझ्या मताप्रमाणे राहावं लागेल ना?” साधना बडबडायची.
“आमच्या सूनबाईकडे लोकशाही नाही. एकाधिकारशाही आहे. मला कसं जमणार गं तिथे?” वासंतीबाई सुलूपाशी मन मोकळं करायच्या. ती कुणाची बाजू घेत नसे. अगदी शांतपणे ऐकून घेत असे. ती एक उत्तम श्रोता म्हणून साधना आणि वासंतीबाई दोघींना आवडत असे.
हर्षने शिवानंदला फोन लावला.
“शिवानंद,आज ऑफिसला जाऊ नकोस.”
“का रे बाबा? आमच्या आईनं काही गोंधळ केलाय का? पडली बिडली नाही ना जिन्यात? तिला हजारदा सांगितलंय की फुलं वेचायला जिने उतरून खाली जाऊ नकोस. फुलपुडी लाव. वाटल्यास फुलपुडीचे पैसे मी देईन. पण ऐकेल तर…”
“तू माझं ऐकशील का आता?” त्याची रेकॉर्ड बंद करून हर्ष म्हणाला, “तुझ्या आईचं काही… आईचं काही… बरं-वाईट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अरे दोन दिवसांचं दूध, पेपर… सारं दाराला तसंच आहे.”
“दोन दिवस? आलो मी… हर्ष… मी आलोच साधनाबरोबर. आलो रे…” शिवानंद एकदम गडबडला.
आणि खरोखर पंधराव्या मिनिटाला हर्षच्या समोर हजर झाला.
“काय करूया?” तो अगदी हताश स्वरात म्हणाला.
“घाबरू नकोस शिवानंद. आपण पोलिसांना फोन करूया. त्यांच्या उपस्थितीत दरवाजाचं लॅच फोडलं, तर बरं असं मला वाटतं.”
“ठीकच सांगतोय हर्ष.” साधना नवऱ्याला म्हणाली.
“कर मग फोन हर्ष. मला काही सुचेनासं झालंय.” शिवाच्या डोळ्यांत पाणी होतं. ते खळ्ळकन गालावर धावलं.
तिची इच्छा होती फार. तिच्या वाढदिवशी सहस्रचंद्र दर्शनाची पूजा घालावी.
पण देवेनची बारावीची परीक्षा म्हणून..!
निदान काल तिच्या वाढदिवसाला यायलाच हवं होतं. चुकलंच.
“हर्ष… मी अगदी स्वार्थी, कृतघ्न मुलगा आहे.” तो हर्षचे खांदे पकडून बोलला. एक महिना झाला होता आईला भेटून. “अहो त्यांचं सोनं झालं. ब्याऐंशी म्हणजे कमी वय आहे का? केव्हातरी माणूस जाणारच ना शिवानंद? आपण तर एवढेही जगणार नाही. मी खात्रीने सांगते.” साधना जे बोलली ते सुलूला आवडलं नाही. निदान वेळ काळाचं तरी भान नको?
यथावकाश पोलीस आले आणि सर्वांसमक्ष दाराचं लॅच फोडलं गेलं. आतली कडी तोडावी लागली.
इमारतीतली अन्य माणसंही एव्हाना जमली होती. सगळ्यांना समोरचं दृश्य बघून धक्का बसला. वासंतीबाई आरामात खुर्चीवर बसून चॉकलेट खात होत्या. शिवानंद सारं दुःख क्षणात विसरला. राग अनावर होऊन म्हणाला, “हे काय आई? तू चक्क जिवंत आहेस?”
“हो. का रे? मेल्यावरच बघायला येणार होतास?” त्यांचा स्वर सगळ्यांचंच काळीज चिरीत गेला.
“मी ठरवलं होतं. सगळ्यांना माझी आसासून आठवण येईपर्यंत नाहीच उघडायचं दार. अरे… दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर राहता. पण आईला महिना-महिना भेटावंसं वाटत नाही? आता काय? मुलाची बारावी! आता काय? सूनबाईची आई आली. आता काय? ऑफिसचं काम. मेली असं वाटून धावत आलास? वाढदिवसाला एक रुपयाचा फोनही महाग झाला? अगदी विटले मी. फोन टाकला तोडून. लक्षात ठेव शिवा… तुला नि या तुझ्या उठवळ बायकोलासुद्धा एक दिवस जख्खड म्हातारं व्हायचंय.” वासंतीबाई बेफाट सुटल्या होत्या.
समोर सगळ्यांचेच चेहरे फोटो काढण्यासारखे झाले होते. फटाफटा बडबडणाऱ्या साधनाची रेकॉर्ड बंद झाली होती. आजींनी पुढ्यातलं चॉकलेट फक्त पोलिसाला देऊ केलं आणि म्हणाल्या, “लागा उद्योगाला. जा. मी खरी मेल्यावर या आता.”