Share

प्रा. देवबा पाटील

मुरली नावाचा एक गरीब मुलगा एका खेड्यावर राहायचा. लहानपणापासूनच त्याला सुंदर-सुंदर मातीची खेळणी बनवता येत होती. तसाही तो अत्यंत गरीब असल्याने आपल्या फावल्या वेळात दररोज खेळणी बनवायचा, ती सुकली म्हणजे त्यांना छान छान रंगांनी रंगवायचा. एखाद्या सुट्टीच्या दिवशी गावाशेजारच्या इरावती नावाच्या शहरात नेऊन विकायचा व खेळणी विकून आलेल्या कमाईवर आई-वडिलांना हातभार लावायचा व शाळेचा खर्च भागवायचा.

असेच एका दिवशी मुरलीचे खेळणी विक्रीचे काम संपल्यानंतर तो आपला खेळण्यांचा खाली हारा घेऊन आनंदपुरातील नेहमीच्या मोहल्ल्यातून चालत गावाकडे परत येत होता. एवढ्यात त्याला त्या मोहल्ल्यातील एका बंगल्याजवळ एक लहान मुलगा आपल्या चेंडूमागे धावत येताना दिसला. चेंडू जोराने टणाटण उड्या मारीत पळत होता अणि तो मुलगा त्यामागे वेगाने धावत होता. त्या बंगल्याला कुंपणभिंत नसल्याने रस्त्यावरून मुरलीला ते दृश्य दिसत होते.

त्या बंगल्याच्या कोप­ऱ्यावर एक छोटी घरगुती विहीर दिसत होती. एक मोठी उडी घेऊन चेंडू विहिरीत गेला आणि अरे, बापरे! विहिरीचा काठ खूपच ठेंगणा असल्याने त्या चेंडू मागोमाग वेगाने धावत आलेला तो मुलगाही त्या विहिरीत पडला. मुरलीने आपला हातचा हारा फेकला आणि “धावा! धावा! मुलगा विहिरीत पडला”, असे जोराने ओरडत तिकडे धावला.

त्याने विहिरीत बघितले. त्यात असलेल्या इलेक्ट्रिक मोटरपंपच्या पाइपच्या साहाय्याने तो सर्र सर्र करीत ताबडतोब खाली गेला. तो विहिरीत तळाशी जाईपर्यंत त्या पडलेल्या मुलाला एखादी डुबकी बसून तो पुन्हा थोडा पाण्यावर आला होता. मुरलीने तो वर आल्याबरोबर एका हाताने त्याचे केस धरले व दुसऱ्या हाताने मोटरपंपचा पाइप धरला. नंतर त्याने त्या मुलाच्या बगलांमधून आपले दोन्ही पाय घातले व त्याला आपल्या पायांच्या कैचीत घट्ट पकडले. मुरली आपल्या दोन्ही हातांनी पुन्हा मोटरपंपचा पाइप पकडून वर येण्याचा प्रयत्न करू लागला.

मुरलीच्या “धावा! धावा! मुलगा विहिरीत पडला” अशा विहिरीत जाण्याआधीच्या ओरडण्याने विहिरीजवळ त्या मुलाचे आई-वडील व सारे शेजारीपाजरी धावत आलेले होते. त्यांनी मुरलीला विहिरीत उतरतानासुद्धा बघितले होते. त्यांनी चटकन एक मोठा लांब जाड दोर आणला व झटकन विहिरीत सोडला होता व ते वरून मुरलीला सांगत होते.

मुरलीने त्या दोराचा आपल्या शरीराभोवती एक वेढा मारला. दोराचे टोक त्या लहान मुलाच्या हातांखालून बगलेत घेऊन त्याच्या छातीवर त्याची पक्की गाठ मारली. त्या मुलाला आपल्या पायांच्या मिठीत तसेच घट्ट पकडले. दोन्ही हातांनी दोर घट्ट पकडला नि जोराने ओढा असा विहिरीतून आवाज दिला.

लोकांनी त्या दोघांना हळूहळू वर ओढले. विहिरीच्या काठावर आल्यावर त्यांना हात देऊन नीट विहिरीबाहेर काढले. सगळे मुरलीच्या धैर्याची तोंडभरून स्तुती करू लागले. मुलाच्या आई-वडिलांनी तर मुरलीचे अत्यंत उपकार झाल्यासारखे खूपखूप आभार मानले. आईने आपल्या मुलाला जवळ घेऊन गोंजारले-पांजारले. त्याचे कान फुंकून त्याला शांत केले.

मुरली त्यांची रजा घेऊन आपला हारा उचलण्यासाठी हा­ऱ्याकडे जाऊ लागला. एवढ्यात त्या मुलाच्या आईचे लक्ष तेथे पडलेल्या दोराकडे गेले. त्या दोराला जेथे मुरलीने धरले होते तेथे रक्त लागलेले तिला दिसले. तिने पटकन तिने मुरलीचे हात आपल्या हातात घेऊन पाहिले. मोटरपंपच्या पाइपला धरून सर्रर्र सरकत जोराने खाली घसरत गेल्याने मुरलीचे तळहात सोलल्याने पूर्णपणे रक्ताळलेले होते. त्याच्या पायांनासुद्धा खरचटले होते. गडघ्यांना जखमा झाल्या होत्या.

तिने तिच्या पतीला त्यांची गाडी बाहेर काढण्यास सांगितले व मुरलीला घेऊन त्याच्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यातले उपचार झाल्यानंतर मुरली म्हणाला, “काकू, आता मी जातो माझ्या गावी.” ‘बाळा,’ ती बाई बोलू लागली, “आज तुझ्यामुळे आमचा मुलगा वाचला. तुझे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही. तू आम्हाला आमच्या मुलासारखाच आहेस. आज तू जेवण करूनच जा.” मुरलीला त्या माऊलीचा शब्द काही मोडता आला नाही. तो पुन्हा त्यांच्या गाडीत बसून त्यांच्या घरी गेला. जेवण झाल्यानंतर त्यांनी त्याला आपल्या गाडीने त्याच्या गावाला पोहोचवले. नंतर त्यांनी आपल्या विहिरीचा काठ नीट उंच बांधून घेतला.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

49 minutes ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

53 minutes ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

2 hours ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

3 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

3 hours ago