Tuesday, July 23, 2024

आराध्य वृक्ष

प्रा. प्रतिभा सराफ

माझ्या बाबांचे आणि आजोबांचे कडाक्याचे भांडण झाले. दोघेही आईस क्युब्स इतके थंड प्रकृतीचे म्हणजे बोलण्याच्या बाबतीत! अशा दोघांचे भांडण होणे कसे शक्य आहे बुवा? असा प्रश्न मला काय कोणालाही पडावा त्यातही गंमत म्हणजे त्या दोघांचे भांडण झाले, माझ्या जन्माच्या चौथ्या दिवशी म्हणजे आहे की नाही गंमत! ही गोष्ट मला कोणीतरी सांगितल्याशिवाय कळली असेल का? अगदी बरोबर. तर ती सांगितली आईने, कारण त्यांच्या भांडणाचा सर्वात परिणाम तिच्यावर झाला. पंधरा दिवसाचे बाळ (अस्मादिक) घेऊन पंधरा तासांचा प्रवास करून तिला मुंबई गाठावी लागली.

तर गंमत काय झाली! फार उत्सुकता ताणून ठेवत नाही. माझा जन्म झाल्याची तार बाबांना गेली. ते खूप खूश होऊन आईच्या माहेरी पोहोचले. तिच्या माहेरचे, वर्षानुवर्ष त्यांच्या घरचे ‘ज्योतिष महाराज’ यांनी माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी माझी पंचांगानुसार जन्मपत्रिका आणून आजोबांच्या हातात दिली. चौथ्या दिवशी बाबा आले आणि आजोबांनी कौतुकाने ती पत्रिका बाबांच्या हातात दिली. पत्रिका बघायच्या आधी बाबांनी माझा चेहरा नुकतीच पाहिला होता. त्या पत्रिकेत लिहिले होते – या मुलीचे नाव ‘नि’ या अक्षरावरून असावे. उदाहरणार्थ नीला, निशा, नीलिमा इत्यादी. बाबा म्हणाले की, माझ्या मुलीचे नाव ‘प्रतिभा’ असेल!

बाबा आणि आजोबा दोघेही तोलून मापून अत्यंत कमी बोलणारे. तरीही आजोबा म्हणाले की, ज्योतिष महाराज यांनी सांगितलेले आम्ही आजपर्यंत कधी डावललेले नाही या मुलीचे नाव ‘नि’ वरूनच असेल! बाबा पुढे काहीच बोलले नाहीत. आल्यापावली परत गेले. बाबांच्या स्वभावात मोठ्या माणसांचा अपमान करणे, त्यांच्याशी मोठ्याने बोलणे, भांडणे किंवा अपशब्द वापरणे असे काहीच नव्हते त्यामुळे ते तिथून निघून गेले. मग काय बाराव्या दिवशी माझे बारसे झालेच नाही. पंधराव्या दिवशी बाबा येऊन आईसोबत मला घेऊन मुंबईत परतले. म्हणजे त्या दोघांचे कडाक्याचे भांडण म्हणजे प्रत्येकाचे आपले एक एक वाक्य इतकेच… तेही आपण साधे बोलताना जितके हळू बोलतो त्यापेक्षाही हळू आवाजातले! मग तेव्हा तरी तीन-चार महिन्यांनी माझे बारसे झाले आणि माझे नाव ‘प्रतिभा’ ठेवले गेले. साहजिकच आजोबा त्या बारशाला नव्हते, हे काही वेगळे सांगायला नको.

मात्र गावात आजोबांनी माझ्या नावाचा (आता नेमके कोणते नाव मनात ठेवून माहीत नाही.) जन्मनक्षत्राचा आराध्यवृक्ष मात्र लावला. कदाचित त्यानंतर खूप सारी आजारपण माझ्या जन्मनक्षत्रावर चहूबाजूंनी वार करून गेली. पण केवळ त्या आराध्यवृक्षामुळे मी आजतागायत जिवंत आहे, असे आई म्हणते! माझा आराध्य वृक्ष हा ‘वड’ असावा, असे आई कधीतरी बोलून गेली. हाच आधारवड माझ्या जीवनाचा आधार झाला. आता बाबा आणि आजोबा असे माझ्या जीवनातील दोन खंदे वड जगात नाहीत पण प्रतिभा आहे आणि प्रतिभेची ‘प्रतिभा’सुद्धा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -