
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता वाहतूक विभागाकडून बसेसच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. यामध्ये दक्षिण मुंबईच्या दिशेने येणारी बेस्ट बसची वाहतूक वळवण्यात आली, तर काही बस स्थगित करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. त्यामुळेच वाहतूक विभागाने लालबाग येथे डॉ. आंबेडकर रोड डाऊन दिशेला बंद केला. त्यामुळेच दुपारी १ वाजल्यापासून बेस्टच्या बसची वाहतूकही वळवण्यात आली.
लालबागच्या दिशेच्या सर्व बस या फ्लायओव्हरवरून वळवण्यात आल्या. बस क्रमांक ५२ देखील मडकेबुवा चौक येथे थांबवण्यात आली. हीच परिस्थिती रविवारीही राहण्याची शक्यता आहे. या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने या दिशेने येणारी वाहतूक थांबवली आहे. वाहतूक विभागाने याआधीच काही रस्त्यांसाठी एक मार्ग बंद राहण्याचा अलर्ट दिला होता.
मोठा अडथळा
यंदा कोरोनाच्या निर्बंधमुक्तीनंतरचा पहिला गणेशोत्सव असल्याने उत्साहाचे वातावरण असून चिंचपोकळी तसेच करी रोड या दोन्ही स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात भाविक पायी लालबागला येत आहेत. त्यामुळेच रस्ते वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. म्हणूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय हा वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे.