
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. त्यातच कोकणात जाणाऱ्या भाविकांना यंदा मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण टोलमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र कोकणात जाणाऱ्या वाहनांवरील फास्टटॅगद्वारे टोलवसुली केल्याचे उघड झाल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर वसुलीचे सर्वाधिक प्रकार घडले असून, भाविकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणी नागरिकांनी परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑगस्टला घेतला होता. त्याची अंमलबजावणी २७ ऑगस्टपासून करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत देण्याच्या सूचना आहेत.
प्रत्यक्षात मात्र टोल नाक्यांवर कर्मचाऱ्यांकडून पासधारक वाहनांचे क्रमांक नोंद केले जात असून, वाहनांवरील फास्टटॅग स्कॅन करून टोलवसुली केली जात आहे. टोल नाक्यावरून पुढे जाताच फास्टटॅगमधून पैसे कपात झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोकणात जाणारे सर्वाधिक भाविक पुणे-बंगळुरू महामार्गानेच प्रवास करतात. राजापूरला जाणारे मलकापूर येथून जातात. सिंधुदुर्ग जाणारे राधानगरी मार्गाने जातात, तर कोयनेतून चिपळूण परिसरातील नागरिकांचा प्रवास होतो. त्यामुळे या नागरिकांच्या वाहनांचे फास्टटॅग स्कॅन करून आर्थिक लूट केली असल्याचे एका भाविकांनी सांगितले.
तर परिवहन विभागाकडे फक्त वाहनांना पास देण्याचे काम देण्यात आले आहे. त्याप्रमाणे पास दिले जात आहेत. परिवहन विभागाकडे पैसे कपातीसंदर्भात कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे, तर वाहनांना मोफत टोलपास परिवहन विभागाने दिल्यानंतर त्यांच्या फास्टटॅगमधून पैशांची कपात कशी झाली, याबाबत अद्याप माहिती नाही. याबाबतीत माहिती आम्ही तपासून पुढील निर्णय घेऊ, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे.