रवींद्र तांबे
हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकाला कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात. त्यात उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळकरी मुलांचा आनंद अधिक उत्साही असतो. कारण आपल्या घरातील, वाडीतील, गावातील व नातेवाईक यांची मुले भेटल्यामुळे मौज, मजा व मस्ती करण्यात वेळ घालवीत असतात. त्यात दोन वर्षांनी भेटल्यामुळे अधिक गप्पांचा फड रंगलेला दिसतो. त्यात अधिक कोरोना काळातील आलेला अनुभव व त्याला कशा प्रकारे तोंड दिले यावरती जास्त चर्चा.
यात काहींच्या डोळ्यांत अजूनही अनुभव सांगताना अश्रू अनावर होतात. अशात कडक उकाड्यामुळे कधी एकदा पाऊस येतो, असे माझ्यासहित प्रत्येकाला वाटत होते. आता पाऊस सुरू होऊन जवळ-जवळ अडिच महिने होत आले. त्यामुळे खेड्यापाड्यात थंडावा निर्माण जरी झाला तरी शहरामध्ये कधी उकाडा, तर कधी थंड वातावरण दिसून येते.
मागील दहा-बारा वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा पाऊस उशिराने सुरू झाला तरीसद्धा बऱ्यापैकी पाऊस लागत आहे. त्यात भात व इतर पिकांची लावणी लावूनसुद्धा पूर्ण झाली आहे. शाळकरी मुले, तर पावसामुळे हवेत थंडगार गारवा निर्माण झाल्याने आनंदाने नाचत बागडत असताना दिसतात. तसेच शाळेत येता जाताना एकमेकांच्या अंगावर पावसाचे पाणी शिंपडत असतात. तेवढीच शालेय जीवनात मजा. उन्हाळ्यात ओसाड दिसणारे जंगल तसेच माळरान पावसामुळे मखमली चादरीप्रमाणे हिरवेगार दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व तरुण यांना हिरव्यागार परिसरामुळे नवे चैत्यन्य निर्माण झाले आहे.
नोकरदार वर्गाला पावसाचे काहीही देणे-घेणे नसले तरी राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा आधार पावसाचा असतो. आजही शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी आपण अधिक पीक घ्यावे, असे शेतकऱ्यांना वाटत असते. मात्र पावसाच्या अनियमित पणामुळे शेतकऱ्याचे स्वप्न अधुरे राहते. तरी पण शेतकरी नाराज न होता आशावादी असल्याचा दिसतो. या वर्षी नाही तरी पण पुढच्या वर्षी अधिक पीक घेऊ, अशी मनात जिद्द निर्माण करीत असतात.
उन्हाळ्यात कोरडे झालेले नदी-नाले पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरी तर काठोकाठ पाण्यानी भरलेल्या दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना दिसतो आहे. तसेच आपल्याला पावसामध्ये भिजल्यामुळे नवीन आनंद घेतल्याचा मिळतो. हेच आहे माणूस व पाऊस यांच्यामधील अतूट नाते. पहिला पाऊस लागला की, वातावरण आनंदित होते. वादळ आणि पाऊस त्यात मातीचा येणारा सुगंधित वास, झाडांना येणारी नव्याने पालवी, बेडकांचा डराव डराव आवाज, पक्षांचा किलबिलाट, डोंगराच्या झाडीतून येणारा अधून-मधून मोरांचा आवाज व मातीच्या सुगंधाने बैलसुद्धा इकडेतिकडे धावू लागतात. हे फक्त आणि फक्त पाऊसच करू शकतो.
प्रत्येकाला लहानपणी पावसामध्ये भिजायला किंवा खेळायला आवडत असते. मी तर माझ्या आयनल गावच्या प्राथमिक शाळेत असताना पाऊस कसा मुसळधार पडतो? हे कदमगुरुजी धडा शिकवीत असतानासुद्धा त्यांची नजर चुकवून मोठ्या खिडकीतून बघत असे. इतकेच नव्हे, तर जमिनीवरून लाटांप्रमाणे वाहनाने गढूळ पाणी त्याचा आनंदच काही न्यारा असतो. आता मात्र पूर्वीसारखे पावसाचे प्रमाण राहिले नाही. हल्ली तर सतत चार-पाच दिवस पाऊस लागून सगळीकडे पाणीच पाणी होते. लोकांचा एकमेकामधील संपर्कसुद्धा तुटला तरी हे जास्त दिवस राहत नाही. यात अनेक गरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात बरेच नुकसान होते. काहींचे तर संसार उद्ध्वस्त होतात.
एक वेळ घनदाट झाडीने दिसणारा परिसर आता गगनचुंबी इमारतीनी घेतलेला दिसतो. त्यामुळे आसपासच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याचा परिणाम पावसाचे पाणी जमिनीत न मुरता जवळच्या नदीवाटे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पाण्याची पातळी खोल जाण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे प्रत्येकांनी पावसाळ्यात किमान एक झाड लावून त्याचे पालनपोषण आपणच केले पाहिजे, असे आपण सार्वजन वचनबद्ध होऊया. म्हणजे पावसाचे पाणी साठायला व पाऊस पडायला आपण मदत करू शकतो.
थोडक्यात प्रत्येकाच्या जीवनातील सुख-दुखाचा विचार करता त्यांच्या जीवनाला नव्याने पालवी व आनंददायी उभारी देणारा पाऊस असतो. पाऊस हा सर्वांना लाभदायक ठरतो. तेव्हा मागील वीस ते पंचवीस वर्षांचा विचार करता उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तेव्हा प्रत्येक वर्षी आपण सर्वांनी ‘एक व्यक्ती एक झाड’ या तत्त्वानुसार एक झाड लावून ते वाढवूया, असा संकल्प करूया.