आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका ही भारताची शान होती आणि आहे. भारतीय संरक्षण दलातील सुसज्ज अशी युद्धनौका एकशे पस्तीस कोटी भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराने बाजूला पडलेली युद्धनौका पुन्हा एकदा दिमाखदारपणे अत्याधुनिक यंत्रणांसह भारताच्या सागर सीमेचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध झाली आहे. विक्रांत विमानवाहू युद्धनौका स्वदेशी बनावटीची आहे. यानिमित्ताने भारतीय नौसेनेला नवा ध्वजही मिळाला असून ब्रिटिश साम्राज्यवादाचे निशाण आता पूर्णपणे इतिहासजमा झाले आहे. भारतीय नौसेनेमध्ये स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही युद्धनौका दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विक्रांत युद्धनौका नौसेनेला सोपविण्याचा कार्यक्रम जवळपास दीड तास चालू होता. इंग्रजांच्या काळापासून क्रॉस चिन्ह असलेले लाल निशाण आता हटवले गेले आहे आणि त्याची जागा तिरंगा व अशोक चिन्हाने घेतली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन तसेच नौदलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत विक्रांतचे पुनरागमन झाले. पंतप्रधान मोदी यांनी विक्रांत युद्धनौका म्हणजे भारताच्या शक्तिशाली प्रतिमेचे प्रतीक आहे असे म्हटले, ते खरेच आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विक्रांत पुन्हा सशस्त्र सज्ज होऊन नौदलात परतली आहे, हासुद्धा योगायोग आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी बाब म्हणजे या कार्यक्रमात पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. शिवाजी महाराजांचे सागरी सामर्थ्य कसे मजबूत आणि शत्रूला धडकी भरवणारे होते, असे सांगून त्यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. नौदलाचा नवा ध्वज नौदलाला शक्ती व आत्मसन्मान देईल, असे सांगितले. नवा ध्वज प्राप्त झाल्याने इतकी वर्षे नौदलावर असलेले गुलामीचे चिन्ह आता कायमचे पुसले गेले आहे. स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे जगात जे काही मोजके देश अशी निर्मिती करणारे आहेत, त्या यादीत आता भारताचे नाव नोंदवले गेले आहे. नौदलाच्या ध्वजावर पूर्वी लाल क्रॉस होता. तो सेंट जॉर्ज क्रॉस होता, जो इंग्रजांच्या युनियन जॅकचा एक भाग होता. १९५० नंतर प्रथमच भारतीय नौदलाचा ध्वज २००१ मध्ये बदलण्यात आला. तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. ध्वजावरील जॉर्ज क्रॉस हटवून डाव्या कोपऱ्यात तिरंगा आला. २००४ मध्ये ध्वज व निशाण यात पुन्हा बदल करण्यात आला. ध्वजात पुन्हा रेड जॉर्ज क्रॉस दिसू लागला. ध्वजावर राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोकस्तंभ दिसू लागला. २०१४ मध्ये नौदलाच्या ध्वजावर देवनागरी भाषेत ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले गेले व जॉर्ज क्रॉस हटविण्यात आला. नौदलाच्या चिन्हावर शं. नो. वरुण… असे लिहिले गेले.
विशेष म्हणजे पंचवीस वर्षांनी आयएनएस विक्रांतचा पुनर्जन्म झाला आहे. दि. ३१ जानेवारी १९९७ रोजी नौदलातून आयएनएस विक्रांतला निवृत्ती दिली गेली. त्याचे पंचवीस वर्षांनी आधुनिकतेचे रूप घेऊन पुनरागमन होणे ही सहज आणि सोपी बाब नाही. विक्रांतवर जी वीजनिर्मिती होते ती इतकी प्रचंड आहे की, पाच हजारांपेक्षा जास्त घरांना वीजपुरवठा होऊ शकेल. त्यासाठी ज्या तारांचा उपयोग केला आहे, त्यांची लांबी कोचीपासून कन्याकुमारीपर्यंत होईल, असा उल्लेख स्वत: पंतप्रधानांनीच आपल्या भाषणातून केला. ज्या अभियंत्यांनी, तंत्रज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी अफाट, अचाट परिश्रमातून या युद्धनौकेचे नूतनीकरण केले, त्यांचे कौतुक करायला शब्द अपुरे पडावेत. त्यांचे संशोधन आणि कौशल्यही अफाट आहे, त्यातूनच विक्रांतचे पुनरागमन झाले आहे. १९७१ च्या बांगलादेश युद्धात शत्रूला धूळ चारण्याचे काम विक्रांत युद्धनौकेने केले होते. विक्रांतवरून लढाऊ विमानांनी बांगलादेशातील चितगांव, कॉक्स बाजार, कुलना येथे शत्रूच्या सैन्याला पळताभूई थोडी केली होती. १९९९ मध्ये कारगील युद्ध झाले. तेव्हा शत्रूचे सैन्य उंचावर होते व तेथून भारतीय सैन्यावर हल्ले केले जात होते. कारगील युद्धानंतर स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची अधिक जरूरी देशाला भासली. सन २००९ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. जवळपास पाचशे कंपन्या विविध कामांत गुंतल्या होत्या. विक्रांत विमानवाहू युद्धनौका चाळीस हजार टन वजनाची आहे. एवढी महाप्रचंड युद्धनौका जगात केवळ चारच देशांकडे आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या देशानंतर आता स्वदेशी बनावटीच्या महाप्रचंड विमानवाहू युद्धनौकांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक नोंदवला गेला आहे. लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स यांचा ताफा आता युद्धासाठी भारताकडे सुसज्ज आहेत. सन २०१७ मध्ये आयएनएस विराटच्या निवृत्तीनंतर आयएनएस विक्रांत हा भारताचा भरभक्कम आधार आहे. १९६५ व १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी सैन्याला कर्दनकाळ म्हणून धडकी भरली होती. पाकिस्तानी नौदलाला जबर भीती वाटावी, अशी कामगिरी आयएनएस विक्रांतने करून दाखवली होती. मुंबईच्या नौदलाच्या शिपयार्डमध्ये काही देखभाल-दुरुस्तीसाठी विक्रांतवर काम चालू असताना १९६५च्या युद्धात पाकिस्तानने भारताची आयएनएस विक्रांत समुद्रात डुबवली, असा दावा केला होता. पण याच विक्रांतने पाकिस्तानी सैन्याला घाम फोडला आणि पाकिस्तानचा खोटारडेपणा जगापुढे आणला. १९७१ च्या युद्धात विक्रांत बजावलेल्या अद्वितीय कामगिरीमुळेच विक्रांतवरील नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांना महावीर चक्राने व १२ जणांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. भारतीय नौसेनेत ७० हजार सक्रिय सैनिक आहेत. शिवाय ७५ हजार राखीव फौज आहेत.