Saturday, March 15, 2025
Homeकोकणरायगडआता रायगड पोलिसांकडेही ‘सायबर क्राईम पोर्टल’

आता रायगड पोलिसांकडेही ‘सायबर क्राईम पोर्टल’

ऑनलाइन गुन्हेगारीला बसेल चाप; फसवणुकीचा व्यवहार होणार ब्लॉक

सुभाष म्हात्रे

अलिबाग : ऑनलाइन व्यवहार वाढत असतानाच फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेकांना याविरोधात तक्रार कुठे करायची हेदेखील माहिती नसते. वेळ निघून गेल्यानंतर पोलीसही काहीच करू शकत नाही. यासाठी यावर मात करण्यासाठी गृहविभागाने सायबर क्राइम पोर्टलची निर्मिती केली आहे. सुरुवातीच्या तासातच पोर्टलवर तक्रार केल्यास ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालता येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मागील महिन्यातच ही सुविधा रायगड पोलिसांकडे उपलब्ध झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे पोलिसांनाही सोपे झाले आहे. अनेक वेळा ओटीपी नंबर दिल्यानंतर, एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन फसवणूक होते. काहीवेळा आमिषे दाखविली जातात आणि त्यातून फसवणूक होते. यातून सहज आणि तातडीने तक्रार नोंद होईल, या उद्देशाने शासनाने एक पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलसाठी शासनाने सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असल्याने कोणत्याही बँकेतील पैसे काही तासातच परत आपल्या खात्याच परत वळते होतात. त्यावर तातडीने माहिती भरल्यास फसवणूक झालेले पैसे ‘ब्लॉक’ करून ते पुन्हा मूळ बँक खात्यावर जमा करण्याची तरतूद केली आहे.

सायबर गुन्हेगारी हे पोलिसांसमोरच नव्हे, तर सर्व नागरिक, ग्राहकांसमोरही आव्हान आहे. फसवणूक झाल्यास पैसे परत मिळतील याची खात्री नसते. ग्रामीण भागातील नागरिकही या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. अनेक वेळा तक्रार करण्यात उशीर होत असतो, त्याच दरम्यान ऑनलाइन व्यवहार पूर्ण होत असल्याने पोलिसांनाही काहीही करता येत नाही. याचमुळे रायगड पोलिसांच्या सायबर सेलकडे मागील सहा महिन्यांत ३० सायबर क्राइमचे गुन्हे पडून आहेत. सायबर गुन्हेगार विविध प्रलोभने दाखवित काही क्षणात बँक अकाऊंटचा बॅलेन्स ‘झिरो’ करतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होतो. सायबर गुन्हेगार दुसऱ्या राज्यात बसून हे गुन्हे करीत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचता येत नाही. यामुळे कमी वेळेत साध्या व सोप्या पद्धतीने तक्रार करण्याची पद्धत गृहविभागाने सुरू केली आहे.

पोर्टलवर तक्रारीची सोपी पद्धत

पोर्टलवर तक्रार फसवणूक झाल्यानंतर तातडीने करावी. ज्यावेळी फसवणूक झाली, त्याच क्षणाला पोर्टलवर जावे. त्याठिकाणी तारीख, वेळ आणि ट्रान्झेक्शन आयडी द्यावे किंवा ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल आला होता. त्याचा नंबर देणे गरजेचे आहे. तक्रार नोंद झाल्यास त्या क्षणाला तुमचे पैसे ज्या ठिकाणी (ज्या बँकेत) आहेत. त्याच ठिकाणी ते ब्लॉक केले जातील. यासाठी

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरुवातीचे तास महत्त्वाचे आहेत. तसेच पोर्टलवर तक्रार केल्यानंतर तक्रारीचे पुढे काय होते? तपास कुठेपर्यंत आला आहे. तक्रारीचा स्टेटस काय आहे, याची माहिती कोणत्याही क्षणाला तुमच्या मोबाइल हॅण्डसेटवर पोर्टलद्वारे मिळते. त्यामुळे तपासाची माहिती कोणालाही विचारण्यासाठी जावे लागत नाही किंवा पोलीस ठाण्यातही यावे लागत नाही.

‘सायबर क्राइम’ वाढल्यामुळे तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी शासनाने पोर्टल तयार केले आहे. यात सर्व बँकांचे नोडल अधिकारी आहेत. फसवणुकीचे पैसे कोणत्याही बँकेत असतील, तर ते परत करण्याची व्यवस्था होते. त्यासाठी फसवणुकीनंतर कमीत-कमी वेळेत पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक आहे.– राजन जगताप, पोलीस निरिक्षण
(सायबर सेल)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -