मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या रविवारी म्हणाजे ४ सप्टेंबर रोजी कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक राहणार नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी बरेच लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक राहणार नाही.
रविवारी शासकीय सुट्टी असल्याने दर रविवारी रेल्वेलाईनवरील कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. परंतु, या रविवारी गणेशोत्सव असल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ होऊ नये यासाठी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने ट्विट करून रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसेल याबाबतची माहिती दिली आहे.
दोन वर्षानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. आता कोरोना महामारीतून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच सणांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यातच मुंबईत गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेश भक्त सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी होत असते. त्यातच मुंबईकरांना लोकलचा प्रवास सोईचा आहे. त्यामुळे मुंबईकर या लोकलनेच जास्तीत-जास्त प्रवास करतात. त्यामुळे लोकांना बाहेर पडल्यानंतर वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.