अलिबाग (वार्ताहर) : सध्या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने तापमानामध्ये वाढ झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादूर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जागरुक राहून भातशेतीचे नियमित सर्वेक्षण करावे आणि वेळीच कीडनिहाय व्यवस्थापनाच्या उपाययोजना करून आपल्या भातपिकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला मात्र त्यांनतर उघडीप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात पाऊस नसल्याने तापमानामध्ये वाढ झाली आहे. या तापमान वाढीमुळे भात शेतींवर किड्यांचे प्रादूर्भाव वाढले आहे. यामध्ये सुरळीतील अळी ही कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते आणि त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. सुरळीतील अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास या किडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे व नंतर किडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. त्यानंतर शेतातील पाणी एका बाजूने बाहेर काढावे व सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर त्या नष्ट कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
तर भात पिकावर खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून, खोडकिडीची अळी प्रथम कोवळ्या पानावर उपजीविका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे रोपाचा मधला भाग वरून खाली सुकत येतो. यालाच `गाभामर’` असे म्हणतात. लावणी नंतर शेतात पाच टक्के कीडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळून आल्यास उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात येत आहे.
निळ्या मुंगेराचा प्रादूर्भाव भात खाचरामधील सखल भागात ज्याठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सकल भागांची शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करावी. फुटव्यांच्या अवस्थेत एक भुंगेरा किंवा एक ते दोन प्रादूर्भावीत पाने प्रति चूड आढळून आल्यास या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजावे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी भात खाचरात पाणी जास्त काळ न साठवता निचरा होईल याची काळजी घ्यावी. भात लावणीनंतर बांध तनविरहीत ठेवावेत. प्रादूर्भाव दिसून येताच त्वरित क्विनॉलफॉस २५% प्रवाही २५ मिली किंवा लॅमडा सायहेलोबीन ५ टक्के प्रवाही ६ मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारणी करावी.