Thursday, March 20, 2025
Homeमहत्वाची बातमीभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई भेटीस!

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई भेटीस!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, पोलिस महासंचालकांशी चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ला आणि घातपाताच्या धमक्या येत असताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याची दखल घेतलेली दिसत आहे. कारण अजित डोवाल शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले असून सकाळपासून त्यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. अजित डोवाल मुंबईत येताच त्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. पुढे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ते पोहोचले आहेत. शिंदेंच्या भेटीनंतर ते पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. डोवाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत विविध आयपीएस अधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास अर्धा-पाऊणतास त्यांनी चर्चा केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जावून त्यांच्याशीही चर्चा केली आहे. येत्या दोन-तीन दिवसात देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी डोवाल मुंबईत आले असल्याचीही शक्यता आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवाया आणि धमकीचे फोन मुंबई पोलिसांना आले आहेत. तसेच रायगडच्या समुद्रकिनारी अज्ञात बोटीत एके-४७ बंदुका आढळून आल्याचेही प्रकरण समोर आलं होतं. या संपूर्ण घटनाक्रमांची माहिती घेण्यासाठी अजित डोवाल मुंबईत आल्याचे बोलले जात आहे.

महत्वाची बाब म्हणजे अजित डोवाल यांच्या मुंबई दौऱ्याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. तसेच त्यांच्या दिवसभराचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे अजित डोवालांच्या या दौऱ्याचं नेमकं कारण काय याची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शनिवारी मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घातपात करण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईत घातपात घडवण्याच्या काही धमक्या आल्या होत्या. तेव्हापासूनच मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच श्रीवर्धन इथे संशयित बोटीवर सापडलेली एके-४७ आणि शस्त्रास्त्रे यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर डोवाल यांच्या या मुंबईतील गाठीभेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -