विरार (प्रतिनिधी) : सध्या वसई-विरार पट्ट्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त अपघात हे बाईकस्वारांचे होत आहे. यामध्ये अनेकांनी हेल्मेट न घातल्याने त्यांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे वसई विरार शहरात पोलीस प्रशासनाकडून हेल्मेट सक्ती करण्याचे प्रयत्न चालू होते. त्यानुसार आता १ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दहा जणांवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड आकारला आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांनी हेल्मेटचा वापर करावा, अशी जनजागृती रॅली काढत कारवाईला सुरुवात केली आहे.
वसई, विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वारांचे अपघात होत असून यात डोक्याला दु:खापत होवून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच गोखीवरे येथील फादरवाडी जवळ एका १८ वर्षीय तरुणाचा हेल्मेटअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशा प्रकारे घडणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. यात पहिल्या कारवाईत पाचशे रुपये, तर दुसऱ्या कारवाईत पंधराशे रुपये दंड व परवाना रद्द करण्यात येणार आहे. तिसऱ्या कारवाईत गाडी जप्त करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास वसई वाहतूक विभाग परिमंडळ २ तर्फे वसई पूर्व पश्चिम, नालासोपारा पूर्व भागात पोलिसांनी दुचाकीवरून हेल्मेट परिधान करून रॅली काढली होती. यावेळी हेल्मेटचा वापर करावा याबाबत प्रबोधन करण्यात आले. याशिवाय ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले होते अशा दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
हेल्मेट हे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केलाच पाहिजे. जे वापर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: शहरातील मुख्य रस्ते, महामार्गाला जोडणारे रस्ते, वर्दळीचे रस्ते अशा ठिकाणी कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची पथके ठेवण्यात येतील. ही कारवाईची मोहीम हळूहळू अधिक तीव्र केली जाईल असे वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सांगितले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. याबाबत सूचनाही केल्या आहेत. परंतु यापुढे जे दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करतील त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. पहिल्या दिवशी दहा जणांवर कारवाई केली आहे.