मुंबई (वार्ताहर) : प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
तब्बल दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर मुंबईत निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी ठाणे, कल्याण आणि पश्चिम उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. या नागरिकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने दर वर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्थीच्या दिवशी ( ता. ९) रात्री उशिरापर्यंत आठ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ४-४ लोकल चालविण्यात येणार आहे.
चर्चगेटहून रात्री १.१५ वा., रात्री १.५५ वा., रात्री २.२५ वा., रात्री ३.२० वाजता या लोकल सुटणार आहेत. परतीच्या मार्गावर विरारहून रात्री १२.१५ वा., रात्री १२.४५ वा., रात्री. १.४० वा. आणि चौथी लोकल पहाटे ३ वाजता धावणार आहे. त्यामुळे भाविकांची रात्रीच्या वेळी प्रवासाची सोय होणार आहे.