डॉ. मिलिंद घारपुरे
गणेश चतुर्थी !!! मित्राकडे मोदकांचे तुडुंब जेवण. भोजनोपरांत गप्पांचा फड. सटासट बदलणारे गप्पांचे रूळ… सामाजिक, अध्यात्मिक अधिभौतिक, आर्थिक, शिवसेना, शिंदे गट, आपोआपच मोदी, अँटी मोदी ग्रुप (चिंता नाही, मतभेद असतील, मनभेद नाहीत)… दुसरा का तिसरा मोदकाचा राऊंड. गप्पा आता अर्थशास्त्रकडे वळलेल्या. मंदी, जीडीपी, नोटबंदी इत्यादी… आता प्रत्येक अर्थतज्ज्ञ झालेला.
अचानक एक खणखणीत आवाज… मित्राची सत्तरीची मावशी, त्या काळात दहावी झालेली “….कसली रे डोंबलाची मंदी, जोपर्यंत भारतामध्ये विविध धर्मांचे, जातीचे, मासानुमास सण, सणवार आहेत आणि दुसरे म्हणजे मध्यमवर्ग जिवंत आहे, तोपर्यंत भारतात कधीही मंदी-फंदी काही नाही आपल्या देशात” …”अरे अगदी साधा छोट्या सणापासनं गणपती, दिवाळीसारखा सण डोळ्यांसमोर आणा, फुललेल्या बाजारपेठा, खरेदी बघा, गरज असल्यापेक्षा गरज नसलेल्या वस्तूंची अफाट खरेदी, देवाण-घेवाण, भेटी-गाठी, त्यानिमित्ताने प्रवास. अगदी स्कूटीपासून विमानापर्यंत. डिस्काउंट आणि सेलच्या नावाखाली होणारी अमाप पैशाची उलाढाल. उधळपट्टी नाही ही. Economy runs!!! कारण कोणी ना कोणी तरी त्या प्रॉडक्ट किंवा सर्विसवर जगत असतो. मावशीचा शांत आणि ठाम सूर…
“एक सण संपतो, मंदीची रडारड, तोपर्यंत दुसरा सण. तो संपेपर्यंत तिसरा… हे कमी की काय, म्हणून आज-काल तुमचे ‘डे’ आहेतच. व्हॅलेंटाइन, बाबा, आई, रोज, ई. ई. साजरा होणारा प्रत्येक “डे किंवा सण” हा एखाद्या व्यावसायिकला जगवतो, पर्यायाने कामकरी वर्गाला…
“मध्यमवर्ग… काबाडकष्ट करून पै-पैसा साठवतो आणि हा जमवलेला पैसा फक्त दोनच वेळा खात्रीलायकरित्या बाहेर काढतो… एक म्हणजे देव धर्म दुसरे म्हणजे लग्नकार्य. मग त्याचा कुठला का धर्म असो.”
“…अरे सव्वाशे कोटींचा हा देश. अधिकांश मध्यमवर्ग. एक लग्न डोळ्यांसमोर आणा. यादी तयार करा. अनंत गोष्टी. किती वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय जगतात ते. अगदी सोन्या-मोत्याच्या, कारच्या व्यवसायापासून बांगड्या भरणाऱ्या माणसापर्यंत. हा मध्यमवर्ग, हे सणवार, लग्नकार्य, हीच भारताची खरी आर्थिक ताकद आणि पाठीचा कणा. कुठलीही पक्ष पार्टी, कोणीही अर्थतज्ज्ञ, बँक व्याजदर काहीही असो. भारत एक हत्ती आहे हत्ती… अगदी गजराज!!! मंद पण ठाम चाल. स्वतःची स्वतंत्र गती. धावत पळत नसला तरी त्याच्यावर अवलंबून असणारे बरेच…” किती खरं किती खोटं??? नाही माहीत… पण थोडं फार तथ्य नक्की या सणवाराच्या अर्थशास्त्रात…!