मराठवाड्यात भाजपचा मास्टरस्ट्रोक

अभयकुमार दांडगे


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाथीने भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविली. त्यानंतर भाजपने आपली रणनीती मराठवाड्यात तीव्र केल्याचे पहावयास मिळत आहे. मराठवाड्यात काँग्रेसचे थोडेफार वर्चस्व आहे; परंतु हे वर्चस्व गाजविणारे नेतेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे मराठवाड्यात काँग्रेस नेस्तनाबूत होईल व भाजपचा हा मास्टर स्ट्रोक असेल, असे राजकीय गणित दिसून येत आहे. या ठिकाणी सध्या अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या रूपाने मराठवाड्याचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यानंतर लातूरचे विलासराव यांचे सुपुत्र अमित देशमुख यांना देखील मानणारा मोठा वर्ग आहे. मराठवाड्यात नांदेड व लातूर जिल्ह्यातच काँग्रेसचे चांगल्यापैकी वर्चस्व आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असतील, तर त्यांच्यासोबत अमित देशमुख हेदेखील सोबत जातील, असे मराठवाड्यात बोलले जात आहे, असे झाल्यास मराठवाड्यातील काँग्रेस ही पूर्णपणे संपल्यात जमा आहे. अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे तसेच मराठवाड्याचे नेतृत्व करणारे नेते आहेत. नांदेड जिल्ह्यातील आमदार हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे तीन आमदार त्यांच्यासोबत आहेत. ही सर्व मंडळी अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये नक्कीच जाईल, असे तर्क काढले जात आहेत.


मराठवाड्यातील तीन नेत्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. लातूर जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील-निलंगेकर तसेच विलासराव देशमुख व नांदेडचे अशोक चव्हाण यांनी यापूर्वी नेतृत्व केले आहे. मराठवाड्यात काँग्रेसची ओळख विलासराव देशमुख तसेच अशोक चव्हाण यांच्यामुळे होती.


शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे मुख्यमंत्रीपद मुलीला जास्त गुण बहाल केल्याच्या प्रकरणात गेले होते, तर अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद आदर्श घोटाळ्यामुळे गेले होते. पण त्यानंतर मात्र मराठवाड्यात त्यांची राजकीय प्रतिमा मलीन झाली होती. विधान परिषदेच्या मतदानप्रसंगी अशोक चव्हाण व त्यांच्यासमवेत सात काँग्रेस आमदार अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसचेच नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्याबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण या दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी हे अशोक चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना वेळ देत नसल्याच्या चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या. या सर्व प्रकरणात काँग्रेसचे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.


अशोक चव्हाण हे भाजपच्या गळाला लागले, तर भाजपची शक्ती मराठवाड्यात नक्कीच वाढणार आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे ९०% नगरसेवक आहेत. नांदेड मनपात तसेच जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यास येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्याचे नक्कीच परिणाम दिसून येतील.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मराठवाड्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची गुरुवारी रात्री मुंबईत बैठक होऊन भाजप प्रवेशासंबंधी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या बातमीमुळे नांदेडमध्ये तसेच लातूरमध्येही चांगलीच खळबळ उडाली आहे. मराठवाड्यात मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. नांदेडला मागील वेळेस महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम या पक्षाने प्रथमच निवडणूक लढवली होती व त्यांचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून देखील आले होते. एमआयएमच्या रूपाने मराठवाड्यात नवीन पक्षाने प्रवेश मिळविला होता. त्यानंतर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्यात काँग्रेस नेस्तनाबूत झाल्यास मुस्लीम समाज पुन्हा एकदा एमआयएमकडे वळू शकतो, असे संकेत दिसत आहेत.


त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यास मुस्लीम मतदार त्यांच्यापासून दूर होतील, असेही सांगितले जात आहे. तसे पहिले तर काँग्रेसपासून अशोक चव्हाण दूर झाले, तर मुस्लीम समाजदेखील अशोक चव्हाण यांच्यापासून दूर जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात अशोक चव्हाण यांना कोणते मतदार साथ देतील हेदेखील पाहण्यासारखे ठरणार आहे. काहीही असले तरी मराठवाड्यातून अशोक चव्हाण व अमित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर भाजप मात्र मराठवाड्यात काँग्रेसला फोडण्यात पूर्णपणे यशस्वी झाली आहे, असे म्हणता येईल.

Comments
Add Comment

सांगली पॅटर्न : कृषी विकासाची नवी दिशा

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठबळामुळे हा प्रायोगिक टप्पा यशस्वी झाला असून, यापुढे दररोज किंवा

कोकण विकासाचा ‘पर्यटन’ मार्ग

महाराष्ट्राच्या विविध भागांच्या विकासाचा विषय चर्चेला येतो तेव्हा विकासावर चर्चा होताना विशेषकरून कोकणातील

विदर्भातील नक्षलवादावर मुख्यमंत्र्यांचा लगाम

आपल्या देशात या नक्षलवादी कारवाया सुरू झाल्या त्या ६० च्या दशकात साधारणतः १९६५-६६ च्या दरम्यान पश्चिम बंगालमधील

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अशीही ‘घुस’खोरी

वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाणारे एमबीबीएस शिक्षण प्राप्त व्हावे, या दृष्टीने लाखो विद्यार्थी व पालक

शेतकरी, सभासदांच्या हिताचे काय?

नाशिक बाजार समितीत सध्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत.

पुणे मनपासाठी भाजपचे 'टार्गेट १२५'

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचेनंतर अंतिम प्रभाग रचनेतही भाजपचा वरचष्मा राहिला आहे. अंतिम प्रभाग