अलिबाग (वार्ताहर) : गाई व म्हैशींमध्ये होणाऱ्या ‘लम्पी स्कीन’ या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेत सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. काळे यांनी केले आहे.
जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्य “लम्पी स्कीन” या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. या रोगाचा प्रादूर्भाव रायगड जिल्ह्यातील पशुधनामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘लम्पी स्कीन’ रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग किटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला, तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. पशुपालकांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. या रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांबाबतची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
“लम्पी स्कीन” रोगाचा संसर्ग “कॅप्रिपॉक्स” विषाणुमुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. डास चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाने बाधित जनावरांच्या अंगावर १० ते २० मिलीमीटर व्यासाच्या गाठी येऊन सुरुवातीस भरपूर ताप येतो. काही जनावरात पायावर सूज येणे, लंगडणे, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे, चारापाणी खाणे कमी करणे अथवा बंद करणे, त्यामूळे दूध उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटते. वेळीच औषधोपचार न केल्यास जनावर दगावू शकते, असे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर या रोगाबाबत दक्षता घेताना बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी घालावी, रोग प्रादूर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चरावू कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करावी, डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करावा, तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे व गोठ्यांमध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करावी, रोग प्रादूर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादूर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करावा, त्याचप्रमाणे या आजाराच्या लक्षणांनी ग्रासित जनावर दिसून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्या जनावरावर उपचार करून घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर नियमित औषध, मलम लावावे. त्याचप्रमाणे पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे असेही कळविण्यात आले आहे.