
मुंबई : मुंबईत लोकलसमोर रुळावर लोखंडी ड्रम ठेवून घातपात करण्याचा डाव मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. सँडहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने रुळावर १५ ते २० किलो दगडाने भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता. मात्र प्रसंगावधान दाखवत मोटरमन अशोक शर्मा यांनी त्वरीत अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. अशोक शर्मा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अशोक शर्मा यांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.
दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सीएसएमटीवरुन खोपोलीकडे जलद मार्गावरुन जाणारी लोकल रवाना झाली. ती पुढे जाऊन सँडहर्स्ट रोड स्थानकात थांबली. सँडहर्स्ट रोड स्थानकातून लोकल पुढे निघाल्यावर मोटरमनला रुळांवर काहीतरी दिसले. संशयास्पद वाटल्याने मोटरमनने अर्जंट ब्रेक लावून लोकल थांबवली. मोटरमन स्वतः लोकलमधून उतरुन त्या वस्तूजवळ गेले. तर तो मोठा ड्रम होता. त्या ड्रममध्ये तब्बल १५ ते २० किलोंचे दगड भरुन ठेवलेले होते. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांच्या मदतीने शर्मा यांनी तो ड्रम हटवला. शर्मा यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.