नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मन विमान कंपनी लुफ्थान्सा एअरलाइनने वैमानिकांच्या एकदिवसीय संपामुळे शुक्रवारी प्रवाशांचा गोंधळ झाला. या संपामुळे जगभरातील ८०० उड्डाणे रद्द केल्याचे समजते. भारतात दिल्लीच्या विमानतळावर दोन विमाने रद्द करावी लागली. त्यामुळे ७०० प्रवासी अडकले होते.
शुक्रवारी पहाटे उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर ७०० प्रवासी अडकले होते. या प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. लुफ्थान्सा एअरलाइनची दिल्लीहून फ्रँकफर्टची दुपारी २.५० वाजता आणि म्युनिकची दुपारी १.१० वाजताची विमाने रद्द करावी लागली.
पहिल्या विमानासाठी ३०० तर दुसऱ्यासाठी ४०० प्रवासी प्रतीक्षेत होते. लुफ्थान्साने गुरुवारी सांगितले की, त्यांची जगभरातील ८०० उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. यामुळे जगभरातील १.३० लाख प्रवाशांवर परिणाम होणार आहे. लुफ्थान्साकडे ५ हजार वैमानिक आहेत. ५.५ टक्के वेतनवाढीची त्यांची मागणी आहे.