Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रपीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल

पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल

शासकीय सुटी असतांनाही जिल्हा प्रशासन यंत्रणेचे कामकाज

नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांचे केवायसी करण्याच्या मोहिमेत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. बुधवारी (दि.३१) शासकीय सुटी असतांनाही जिल्हा प्रशासन यंत्रणेने केलेल्या कामकाजामुळे नाशिक जिल्ह्याने हिंगोलीला मागे टाकले. जिल्ह्यात केवायसी अपडेशनचे कामकाज ७६.९३ टक्के इतके झाले आहे तर हिंगोलीत ७६.५३ टक्के केवायसी झाले.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट अखेर आपल्या खात्याचे केवायसी करणे बंधनकारक होते. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पुर्ण झालेले असेल अशाच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पुढील हफ्ता दिला जाणार असल्याचे केंद्राकडून जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचे केवायसी पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू होती.

पीएम किसान योजनेचे काम कुणी करावे याबाबत जिल्ह्यात सुरूवातीला कृषी आणि महसूल विभागात बेबनाव निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी कृषी, महसूल आणि ग्रामसेवक कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन गावे वाटप करीत कामकाजाच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरू झालेल्या कामकाजानंतर केवायसी कामकाजाचा टक्का वाढला आहे.

नाशिक जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे सुमारे साडेचार लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी ३ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे केवायसी पूर्ण केलेले आहे. अद्याप २३ टक्के शेतकऱ्यांचे केवायसी झालेले नाही. या शेतकऱ्यांना मदतीचा पुढील हफ्ता मिळणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम आहे. केवायसी मोठ्या प्रमाणात राहिल्याने त्यांना मुदतवाढ मिळाली की नाही याबाबत जिल्हा प्रशासनाला अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -