Sunday, March 23, 2025
Homeदेशगुलामीची एक निशाणी भारताने आज उतरवली-पंतप्रधान

गुलामीची एक निशाणी भारताने आज उतरवली-पंतप्रधान

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना अर्पण

कोची : भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवले आहे. भारताने गुलामीची एक निशाणी आज उतरवली. याचे कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होते. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारे भारतीय नौदलाचे चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि नो वरुण: हे ब्रीद लिहिलेले आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण करताना दिली. नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचे महत्त्व जाणले. त्यांनी नौदलाचा विकास केला, असेही मोदी म्हणाले.

आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल १३ वर्षे लागली, अशी आयएनएस विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलात सामील केली. यावेळी पंतप्रधानांनी नवीन नौदल चिन्हाचेही अनावरण केले.

स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल

संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यावेळी “भारतीय सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा गौरव केला.

विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे. विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल १४०० पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत. तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजले जाते. विमानवाहू युद्धनौका बांधणे हे जगात आतापर्यंत फक्त मोजक्याच देशांना शक्य झाले आहे. आता यामध्ये भारताचीही भर पडली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -