नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आपला शेजारी देश पाकिस्तानात देखील पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे आत्तापर्यंत पाकिस्तानात १ हजार २०० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बिहारमध्येही मुसळधार पावसामुळे नवे संकट ओढवले आहे. गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे बिहारमधील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुसळधार पावसामुळे गंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व घरे, रस्ते पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. लोक वाहतुकीसाठी बोटींचा वापर करत आहेत. मात्र सर्वांसाठी बोटींची व्यवस्था करणे हेही प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. मुंगेरच्या कुतुलपूरच्या रस्त्यांवर तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. लोकांना पाण्यातून जावे लागत आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली तर लोकांना घरात राहणे कठीण होणार आहे.
बिहारची राजधानी पाटण्यात गंगेने उग्र रुप धारण केले आहे. येथील पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. राजधानीच्या मौजीपूर येथील नदी पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली शेकडो वाहने गंगेच्या पुरात बुडाली आहेत. मुसळधार पुराच्या वेळी वाहने वाहून जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाहनांना दोरीने बांधले आहे.
उत्तराखंडच्या धारचुलामध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हरदिया नाल्यातील भरावामुळे इथे बांधलेला पूल देखील वाहून गेला आहे. त्यानंतर आजूबाजूचे लोक अडचणीत आले आहेत. तसेच कर्नाटक राज्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. या पुरामुळे पाकिस्तानात खूप मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत आहे. तर पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना वाचवण्यात येत आहे. पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण पुराचा सामना करत आहे.