Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

सिन्नरमध्ये पुराचा कहर; उभी पिके, घरे पाण्यात

सिन्नरमध्ये पुराचा कहर; उभी पिके, घरे पाण्यात

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातून ५,८८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातही ढगफुटीसदृश्य पावसामुळे आलेल्या पुराने कहर केला असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. जोमात आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

सिन्नर तालुक्यात रौद्ररूपी पावसानंतर आलेल्या पुरामुळे कित्येक घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे हंगामातच शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे. यामध्ये काही हेक्टर जमीन पिकांसहित वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी उभ्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडू लागलेत. त्यामुळे सिन्नरमध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे.

दोन दिवसापासून पूराचा जोर वाढल्यामुळे शेती वाहून गेली असून शेतमाल पूर्णपणे खराब झाला. आता यातून काहीच उत्पन्न मिळणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. तर काही नागरिकांच्या राहत्या घरात पाणी गेल्यामुळे झालेले नुकसान पाहून नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. काही घरांचे पूर्ण नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून दखल घेण्यात येत असून पंचनाम्याला सुरूवात झाली आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात नुकसान झालेल्यांना मदत कधी मिळणार, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला असून या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे सिन्नरमध्ये काही लोकं अडकून पडले होते. त्यांना प्रशासनाकडून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी मागच्या तीन दिवसांत पावसाने हजेरी लावली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >