Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीआता काँग्रेसही फुटणार?

आता काँग्रेसही फुटणार?

शिंदे कॅबिनेटमध्ये काँग्रेस नेत्यांची वर्णी लागणार!

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधीच केंद्रातील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस अडचणीत आहे. तर आता महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेतील जवळपास ४० आमदार फुटून शिंदे-फडणवीस प्रणित शिवसेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर, आता काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात यापैकी २ काँग्रेस नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही भाजपकडून जोरदार धक्का देण्याची चिन्हं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आशीष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली. त्यांच्यासोबत तीन नेते आणि ९ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते. या भेटीमागचे निमित्त गणपतीचे असले तरी या दरम्यान काय चर्चा झाली असावी यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमधील खदकद विधानपरिषद निवडणुकीपासूनच दिसलेली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासूनच राजकीय वर्तूळात सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून भाजपात सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -