प्रा. नंदकुमार गोरे
गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसला अध्यक्ष मिळत नाही, निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली जाते, अशा तक्रारी ऐकायला मिळत होत्या. पक्षातल्या जी-२३ गटाने अध्यक्ष निवडीचा आग्रह धरला होता. त्यातच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर काँग्रेसने अध्यक्षनिवडीचा कार्यक्रम जाहीर केला; परंतु काँग्रेस पक्षातूनच या निवडीवर प्रश्नचिन्हं लावली जात आहेत.
काँग्रेसने आपल्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र पक्षांतर्गत अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. आता पक्षातच निवडणूक प्रक्रियेपुढे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेले नेते निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी, दहा जनपथजवळचे नेते या वादांवर पडदा टाकून पक्षात सर्व काही ठीक आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक कार्यक्रमाला अंतिम रूप देण्यासाठी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्द्यावर जोरदार वाद झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना अनेक प्रश्न विचारले. शर्मा यांनी ‘एआयसीसी’ प्रतिनिधी निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारलं की, प्रतिनिधी कसे निवडले गेले? ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीवर बैठका कधी झाल्या? शर्मा यांनी दावा केला की, त्यांना अनेक राज्यांमधून अशी तक्रार आली आहे. लोकप्रतिनिधी निवडण्याबाबत पक्ष अंधारात आहे. त्यावर पक्षाध्यक्षांनी मधुसूदन मिस्त्री यांना परिस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. अध्यक्षपदाच्या उमेदवारांना ‘एआयसीसी’च्या प्रतिनिधींची यादी उपलब्ध करून दिली जाईल, असं मिस्त्री म्हणाले. यानंतर शर्मा शांत झाले; परंतु त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी मिस्त्री चांगलेच अस्वस्थ झाले.
बैठकीनंतर मिस्त्री यांनी, या प्रक्रियेतून इथपर्यंत पोहोचलेलेच आता यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असं उत्तर दिलं. त्यातून काँग्रेसमधली गटबाजी किती शिगेला पोहोचली आहे, हे लक्षात यावं. विशेष म्हणजे शर्मा हे पक्षातल्या त्या असंतुष्ट नेत्यांपैकी एक आहेत, जे गेल्या दोन वर्षांपासून पक्षाला पूर्णवेळ, सक्रिय अध्यक्षपद देण्याची मागणी करत आहेत. पक्षातल्या जी-२३ गटाचं नेतृत्व गुलाम नबी आझाद यांनी केलं. गेल्या आठवड्यात त्यांनी पक्ष सोडला. त्यांच्या आधी अनेक नेत्यांनीही पक्ष सोडला. आझाद यांनी पक्ष सोडताना सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पाच पानी पत्रात शर्मा आता जसे प्रश्न उपस्थित करत आहेत, तसे प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसमधल्या जी-२३ गटातील अनेक नाराज नेतेही पक्षाध्यक्ष निवडीबाबत शर्मा यांचा आवाज ऐकत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण १०, जनपथच्या जवळ असणारे हे बंड आतून दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची कमान पक्षातील माध्यम विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश सांभाळत आहेत. शर्मा यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये येताच जयराम यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा इन्कार केला. त्यांनी ट्वीट केलं की, बैठकीत कोणीही प्रश्न किंवा शंका उपस्थित केली नाही.
काँग्रेसने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, पुढील महिन्यात २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक होईल आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दिवाळीपूर्वी पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. २४ ऑक्टोबरला दिवाळी आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी नऊ हजारांहून अधिक प्रतिनिधी मतदान करू शकतील. काँग्रेसने ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहीर केलं होतं की, या वर्षी २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान नवीन पक्षाध्यक्षाची निवडणूक होणार आहे. मात्र सध्या ती आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पक्षाच्या घटनेनुसार केली जाते. याची सुरुवात सदस्यत्व मोहिमेपासून होते. त्यानंतर बूथ कमिटी, ब्लॉक कमिटी आणि जिल्हा कमिटी तयार केली जाते. प्रत्येक जिल्ह्यातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा एक पदाधिकारी काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करतो. निवडणूक कार्यक्रम पक्षाचा केंद्रीय निवडणूक प्राधिकरण बनवतो. हे केंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणे काम करतं. निवडणूक समिती तयार झाल्यानंतर, निवडणूक वेळापत्रकात प्रत्येक टप्प्यावर निवड, नामनिर्देशन, माघार, छाननी, निवडणूक, निकाल आणि विजयानंतरचं प्रमाणपत्र यासाठीच्या तारखा देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यात एक रिटर्निंग ऑफिसर आणि एक ते दोन एपीआरओ (राज्यांच्या आकारानुसार सहाय्यक राज्य रिटर्निंग ऑफिसर) नियुक्त केले जातात. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे प्रस्तावक बनतात. काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो. उमेदवारांची नावं रिटर्निंग ऑफिसरकडे पाठवली जातात आणि निवडणुकीची तारीख निश्चित केली जाते. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरोखरच निवडणूक होणार का?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी त्यांनीच अध्यक्ष व्हावं, असा काँग्रेसजनांचा आग्रह आहे. जी-२३ गटाचे विलास मुत्तेमवार, शशी थरुर यांची नावं अध्यक्षपदासाठी घेतली जातात. थरूर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे; परंतु राहुल नसतील, तर गांधी परिवार त्यांच्या विश्वासातले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवू शकतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी या चार पिढ्यांशी त्यांचे संबंध आहेत आणि काँग्रेसमध्ये ‘मास बेस’ असलेला एकमेव नेता अशी त्यांची ओळख आहे. असं असलं, तरी भाजपचं जसं राष्ट्रीय अध्यक्षपद प्रॉक्सी असतं, सर्व निर्णय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शाह घेतात तसेच काँग्रेसमध्येही होणार आहे. राहुल गांधी हेच निर्णय घेणार असून फक्त नावाला अध्यक्षपद गेहलोत यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी काँग्रेसमधल्या बहुतांश नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसते. राहुल त्यांच्या मतांवर किती ठाम राहतात, यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाही असल्याचे ढोल कितीही वाजवले जात असले, तरी जी-२३ गटाच्या नेत्यांची कुचंबणा करून बाहेर जायला कसं भाग पाडलं, हे वेगळं सांगायला नको. २०१७ च्या निवडणुकीत शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना उमेदवारी दाखल करू देण्यात आली नाही, यावरून राहुल उमेदवार असतील, तर कुणी धाडस करणार नाही, हे सिद्ध होतं. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक २००२ मध्ये झाली होती. त्यानंतर जितेंद्रप्रसाद यांनी सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांना त्या निवडणुकीत ७,५४२ मतांपैकी फक्त ९४ मतं मिळाली होती. राहुल यांनी गेल्या सात वर्षांमध्ये जे निर्णय घेतले, त्यांच्याभोवती जो कंपू निर्माण झाला आणि त्यांच्याच निकटवर्तीयांनी पक्ष कसा सोडला तसेच विरोधकांना पक्ष सोडायला कसं भाग पाडलं, हे जगजाहीर आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही राहुल गांधी यांनी उमेदवारी दाखल केली, तर त्यांच्याविरोधात कुणालाही उमेदवारी अर्ज दाखल करू दिला जाणार नाही, अशी शक्यता आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर पक्षाचा नवा अध्यक्ष कसा असावा, कोण असावा? यावरही गदारोळ सुरू आहे.
पक्ष राहुल गांधींना अध्यक्ष करण्याच्या बाजूने असला तरी त्यांनी उमेदवारीसाठी स्पष्ट नकार दिला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. पक्ष वाचवण्यासाठी आता पावलं उचलावी लागतील, असं त्यांनी म्हटलं. एखाद्याला ‘कठपुतली अध्यक्ष’ करून बॅकसीट ड्रायव्हिंग करण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस टिकू शकणार नाही, असं चव्हाण म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणीसह सर्व पदांसाठी निवडणुका झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. राहुल यांना अध्यक्ष व्हायचं नसेल, तर पर्यायी व्यवस्था करून काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला पाहिजे. राहुल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेसमधला जी-२३ गट असो वा जुनी काँग्रेस; राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर एक वर्ग नेहमीच प्रश्न उपस्थित करत आला आहे. गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश वर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आधी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनीही राहुल यांच्यावर असेच आरोप केले होते. या यादीत कपिल सिब्बल, अश्विनीकुमार, ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह आणि सुनील जाखड या नेत्यांची नावं आहेत. काँग्रेस हा आता घराण्याचा पक्ष झाल्याचं या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जुन्या काँग्रेसजनांना हाकलून देण्यास सुरुवात केल्याचे आरोप राहुल यांच्यावर होत आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या संघातील बिगरराजकीय लोकांना प्राधान्य दिलं. या परिस्थितीत सर्वांचा पक्षावरील विश्वास दृढ व्हायचा असेल, तर अध्यक्षपदाच्या निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. तेच मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे.