बाप्पांच्या दर्शनाने अमित शहा करणार शुभारंभ!
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा, सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करणार आहे. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शाहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे.
अमित शाह ५ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.
विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होणार आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल.
अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येतात. शाह २०१७ मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत.
दरम्यान, भाजपने आशिष शेलारांकडे पुन्हा मुंबईची जबाबदारी दिली आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. काही दिवसापूर्वीच त्यांनी आपली झलक दाखवली होती. आशिष शेलार म्हणाले होते, ”मुंबईवरील एका कुटुंबाची मक्तेदारी संपली पाहिजे. आमचे २००+ नगरसेवक निवडून येतील आणि आमचे ४५+ खासदार निवडून येतील.”