Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीएनआयएकडून दाऊदवर २५ लाखांचे बक्षीस

एनआयएकडून दाऊदवर २५ लाखांचे बक्षीस

छोटा शकिलची माहिती देणाऱ्यास २० लाख

अनिस इब्राहिम, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या साथीदारांची माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलवर २० लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

एनआयएने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दाऊद इब्राहिम कासकरला संयुक्त राष्ट्राने ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित केले. दाऊद कासकर त्याच्या जवळच्या साथीदारांसह डी-कंपनी नावाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवतो. शस्त्रास्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनाची तस्करी करण्यासाठी दाऊदने भारतात डी कंपनी स्थापन केली आहे. डी कंपनी पाकिस्तानी संस्था आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षिसे जाहीर करण्यात आले आहेत.

एनआयएने म्हटले आहे की, डी गँग तस्करी, नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्ड गुन्हेगारी सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, मालमत्तेचा अनधिकृत ताबा / संपादन अशा अनेक कृत्यांत सहभागी आहे. तसेच, डी गँगकडून दहशतवाद्यांना निधी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना सक्रिय सहकार्यही केले जाते. लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदासारख्या संघटनांसोबतही डी गँगचे संबंध असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणेकडून याचा तपास सुरू आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. त्याशिवाय भारतातही दाऊदविरोधात दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवण्यात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. दाऊद इब्राहिमकडून डी-कंपनी ही टोळी चालवण्यात येते. यामध्ये हाजी अनिस उर्फ अनिस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन उर्फ टायगर मेमन आणि इतरांचा टोळीत समावेश आहे. हे सर्व आरोपी गुन्हेगारी, दहशतवादी कृत्यात सामिल आहेत.

काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एनआयएने मुंबईत काही ठिकाणी छापेमारी केली होती. हे छापे दाऊद इब्राहिमशी संबंधित ठिकाणे, त्याच्या निकटवर्तीयांवर होते. या छापेमारीत तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. त्यानंतर एनआयएने काहींना अटक केली होती. एनआयएने सलीम फ्रूटला अटक केली. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेव्हणा आहे. काही दिवसांपूर्वी सलीम फ्रूट हा अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात पत्नीसह सामिल झाला होता. या लग्नात दाऊदसाठी खास सूट, अनिसच्या मुलीसाठी दागिने नेण्यात आले होते. मात्र, सलीम फ्रूटने या आरोपांचा इन्कार केला असल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -