गणेशोत्सव आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. कोरोना महामारीमध्ये दोन वर्षे निर्बंध असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यावर, उत्साहावर मर्यादा पडल्या होत्या; परंतु यंदा सरकारनेच गणेशोत्सव निर्बंधमुक्त केल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण येणे स्वाभाविकच आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महिनाभर अगोदरच गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सरकारनेही भाविकांसाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्स्प्रेसची सुविधा उपलब्ध झालेली आहे. हजारो एसटी बसेसची कोकणसाठी बुकिंगही झालेली आहे. राजकीय घटक तसेच समाजसेवक आपल्या विभागातील जनतेसाठी वाहनांची सोय करत आहेत. कोकणच्या चाकरमान्यांची यंदाची लगबग व उत्साह विलोभनीय आहे. कोरोनामुळे दोन वर्षे कोकणवासीयांना गावी जाणे शक्य झाले नाही. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल-उरणसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतही गणेशोत्सवामुळे अर्थकारणाला गती मिळाली आहे. गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांचा आढावा घेतला असता, पूर्वीच्या तुलनेत गणेशमूर्तींची बुकिंग वाढलेली दिसून येते. गणेशमूर्तींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी भाविकांचा उत्साह तोच आहे.
गणेशोत्सवाची रोषणाई, आगमन-विसर्जनासाठी लागणारे ढोल, बॅण्जो पथके तसेच देवबाप्पाच्या आराससाठी दररोज लागणारी फुले, सजावटीचे विविध साहित्य, मोदक-लाडू यांसह अन्य विविध साधनांच्या होणाऱ्या विक्रीमुळे व या अकरा दिवसांतील उलाढालीचा आकडा करोडोंच्या घरात जात असल्याने काही प्रमाणात का होईना, अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ यंदा दूर होणार आहेत. गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक बाब असल्याने सभोवतालच्या इमारतींमधील रहिवाशांकडून तसेच व्यावसायिकांकडून होणारी वर्गणी आणि संभाव्य खर्च यामध्ये तफावत असल्याने उर्वरित खर्चाचा खड्डा भरून काढण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी स्वत:च्या खिशाला झळ देऊ लागले आहेत. कोरोना निर्बंध हटविण्यात आले असले, तरी कोरोनाचे सावट कायम आहे. आजही कोठे ना कोठे कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडतच आहेत. त्यातच मंकीपॉक्सचे भूत नव्याने निर्माण झालेले आहे. पावसाळा असल्याने ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीचे आजार आहेतच.
नवनवीन येणाऱ्या आजारांनी व त्यावर उपचार काय करायचे? याबाबत आरोग्य विभागात धन्वतंरीच्या पुजाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याने सर्वांच्याच झोपा उडाल्या आहेत. “विघ्नहर्त्या गणराया प्रत्येक भाविक तुझी भुतलावर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तुझा सहवास हा फाटक्या खिशाच्या गरिबांपासून ते गर्भश्रीमतांपर्यंत प्रत्येकालाच हवाहवासा वाटत आहे. त्यामुळे बेंबीच्या देठापासून गणेशभक्त ‘तुम्हारे इन भक्तजनों मे हमसे बढकर कौन?’- हे कित्येक वर्षांपूर्वीचे आणि त्या काळात दर वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये हमखासपणे वाजविले जाणारे गाणे आजही मोठ्याने गाताना पाहावयास मिळत आहेत.” कोरोना महामारीने होत्याचे नव्हते झाले आहे. अर्थकारण मंदावले आहे. अनेक घरांमध्ये बेरोजगारी वाढली आहे, तर अनेक घरांमध्ये भिंतीवर लागणाऱ्या फोटोंची संख्याही वाढली आहे. मुलांना अनाथ, तर महिलांना विधवा होण्याची पाळी आली आहे. अनेक घरांचा कर्ता पुरुष गमावला गेला आहे. आभाळ फाटले आहे, तरीही आपले दु:ख बाजूला ठेवून भक्तगण तुझ्या स्वागतासाठी आतुरले आहेत. कारण तुझ्यावर त्यांची श्रद्धा आहे, भावना आहे, त्यांना दु:खातून तूच बाहेर काढू शकतो, असा भक्तांचा तुझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या लेखी तूच त्यांचा सुखकर्ता व दु:खहर्ता असल्याने हेही दिवस बाप्पांमुळे निघून जातील, असे गणेशभक्तांकडून सांगण्यात येत आहे. आल्या दिवसाचा संघर्ष करत आहेत. तरीही ते हार मानण्यास तयार नाहीत. कारण, दु:खातून तारून नेण्यास विघ्नहर्ता समर्थ आहे, असा भक्तांचा तुझ्यावर विश्वास आहे बाप्पा. भक्तांना आता तुझाच आधार आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत उत्पन्नाचा आलेख वाढत नसल्याने अनेकांवर अर्धपोटी राहण्याची तसेच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. घराघरात नैराश्य पसरले आहे. दोन वर्षांमध्ये बाप्पा, तुझ्या भक्तांनी खूप भोगले आहे, सोसले आहे, तरीही ते याबाबत कोणाकडे तक्रार करत नाहीत. तुझ्या आगमनामुळे किमान अकरा दिवस तरी या चित्रामध्ये बदल झालेला पाहावयास मिळणार आहे. जल्लोष, उत्साह, आरत्या म्हणण्याची स्पर्धा, बाप्पांच्या दर्शनासाठी घरात येणाऱ्या विविध पाहुण्यांच्या सरबराईची लगबग, विठ्ठलाची आरती म्हणताना ‘पंढरपुरी आहे’ म्हणताना लावण्यात येणारी लांबलचक ताण सर्व काही अडचणी विसरायला लावणारी आहे. गणराया तुझे आगमन होण्यापूर्वी मंडपांमध्ये लागलेली तुझ्यावरील गाणी भक्तांच्या उत्साह वाढविण्यास हातभार लावत आहेत. बाप्पा, तू विघ्नहर्ता आहे. भक्तांच्या अडचणी जाणतो. सध्या काय दिवस सुरू आहेत, हे तुझ्यापासून लपून राहिलेले नाही. भक्तांच्या अडचणी दूर कर. त्यांना संकटाचा सामना करण्याचे सामर्थ्य दे. भुतलावरील विविध जीवघेण्या आजारांचे निवारण कर. बाप्पा तुझ्या आगमनासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे.
घराघरात गृहिणींची धावपळ सुरू झालेली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात राबवणारे कार्यकर्ते घरच्या गणरायाच्या सजावटीकडे कमी आणि सार्वजनिक गणरायाच्या सजावटीमध्ये अधिक व्यस्त राहू लागले आहेत. बाप्पा ये लवकर, तुझ्या आगमानामुळे निर्माण झालेला ११ दिवसांचा कायापालट भक्तांच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहू दे! विघ्नहर्त्या विघ्न दूर कर बाबा, सध्या दिवस चांगले नाहीत. भक्तांच्या पाठीशी उभा राहा रे बाप्पा! विघ्नांचा डोंगर समोर आहे. उच्चारही धड करता येत नाही, अशा नवनवीन आजारांचा उद्रेक होऊ लागला आहे. गणराया भक्तांची काळजी घे, तू या संकटातून नक्कीच त्यांचे निवारण करशील, याची प्रत्येकाला खात्री आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुझ्याच आगमनाचे सुख पाहावयास मिळत आहे. बाप्पा भूतलावर लवकर ये आणि विघ्नहर्ता हा नावलौकिक कायम ठेव बाप्पा…