शेषराव वानखेडे
नवी मुंबईतील प्रसिद्ध १२५० फ्लॅट, सहा सोसायट्या मिळून बनलेल्या मिलेनियम टॉवर्स, सानपाड्यामध्ये पहिल्यांदाच ‘सहा सोसायट्या, एक गणपती’ म्हणजेच ‘संपूर्ण मिलेनियम टॉवर्स एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ या धर्तीवर ‘संपूर्ण मिलेनियम एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे दैनिक ‘प्रहार’शी बोलताना येथील मिलेनियम टॉवर्स क्लब कमिटीचे मेंबर भास्कर अय्यर यांनी सांगितले.
सर्वांनी एकत्र येत एकात्मतेची भावना वाढीस लागण्याच्या दृष्टीने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता. तोच विचार घेऊन आम्ही कार्यरत असून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मिलेनियम टॉवर्समध्ये आम्ही ही संकल्पना राबवत असून हिच संकल्पना मुंबईकरांनी राबवावी, असेही ते म्हणाले.
सहा सोसायट्या आणि सुमारे १२५० फ्लॅटमधून राहणारे जवळपास पावणेचार हजार रहिवासी एकत्रितरीत्या गणेशोत्सव साजरा करणार आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना या महाभयंकर रोगाची साथ सर्वत्र पसरली होती. त्यामुळे गणेशोत्सवच नव्हे तर, सण-उत्सव साजरे होऊ शकले नाहीत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे.
३१ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनानंतर सर्वांनी एकत्र यावे, म्हणून प्रत्येक सोसायटीत वेगळा गणेशोत्सव साजरा न करता सहा सोसायट्या मिळून एकच गणपती महोत्सव साजरा करावा, असा मिलेनियम टॉवरमधील रहिवाशांनी निश्चय केल्यामुळे यंदा एकच गणपती मिलेनियम टॉवरमध्ये स्थापन केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बुधवार ३१ ऑगस्ट रोजी गणेशाची प्रतिष्ठापना होऊन १२.३० वाजता स्थापना पूजा करण्यात येईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दहादिवसीय गणेशोत्सवादरम्यान कराओके, झुंबा, ड्रॉइंग, मल्लखांब, वन मिनिट क्वीझ, फॅशन शो, अंताक्षरी, डान्स, मॉम अॅण्ड सन, प्रिंसेस अॅण्ड डॅड, कथाकथन, मंगळागौर, फनफेअर असे विविध कार्यक्रम होणार आहेत, तर ६ ऑगस्ट रोजी ‘डिजिटल एडिक्शन’ या विषयावर वैचारिक चर्चासत्र होणार आहे. यात मिलेनियम टॉवरमधील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तसेच मिलेनियम टॉवरमधील रहिवाशांच्या घरी तयार होणारे वेगवेगळे पदार्थ ५६ पदार्थ एकत्रित करून (५६ भोग) त्याचा महाप्रसाद म्हणून, भजन झाल्यावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अलका भुजबळ व डॉ. संजीवनी कुमार यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. तसेच या वेळी गणपती समोर सर्व मिलेनियममधील राहिवासी अथर्वशीर्षचे सामूहिक २१ आवर्तने म्हणणार असल्याचे अलका भुजबळ यांनी सांगितले. मिलेनियम टॉवरमध्ये डॉक्टर्स, वकील, अभियंते, शासकीय अधिकारी, प्राध्यापक यांच्याबरोबरच चित्रपट क्षेत्रांतील निर्मातेही वास्तव्यास असून येथेच आसामी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील निर्माते व पद्मभूषण जानू बरूवा हेही वास्तव्यास आहेत.
दहा दिवस साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी ड्रेसकोड परिधान केलेल्या कलाकारांच्या सहभागाने लेझिम, ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे. यात सोसायट्यांमधील सर्व भाविक भक्त सहभागी होणार आहेत. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी भास्कर अय्यर, श्रीकांत जोशी, नंदुर्डीकर, सावंत, बालाजी, हिंगणे अनिला, डॉ. संजीवनी कुमार, भारती रेड्डी, नितेश झा, आरती पवार यांच्यासह जवळपास ६० ते ७० स्वयंसेवक अतिशय उत्साहाने गणेशोत्सव उत्तमरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.