नाशिक (प्रतिनिधी) : आम्हाला ज्यांनी भाषा दिली, भाषेचे ज्ञान दिले, इतके मोठे मोठे ग्रंथ ज्यांनी आम्हाला दिले. त्या चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झाले पाहिजे ही मागणी अतिशय योग्य मागणी आहे, असून लवकरच योग्य ती पाऊले उचलून ही मागणी पूर्णत्वास नेली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर कालपासून तीन दिवसीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी उपस्थिती दिली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले मध्यंतरीच्या काळात शासनाने आम्ही मुंबईला मराठी विद्यापीठ करू सांगितले, मात्र मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, पण ज्या ठिकाणी मराठीच्या पहिल्या ग्रंथाला जन्म घेतला. त्या ठिकाणी मराठीतली पहिली कविता गायली गेली. ज्या ठिकाणी मराठीतले साडेसहा हजार ग्रंथ तयार झाले. ज्या ग्रंथांनी संपूर्ण भारतामध्ये अटकेपार मराठीचा झेंडा रोवला. त्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ झाले पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा केली असून लवकरच यावर सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय करून हेच मी आपल्याला यानिमित्ताने खर म्हणजे सांगणार आहे.
श्री चक्रधर स्वामींनी दत्तवादी तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आणि त्यानुसार त्यांनी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर असे चार नित्य आणि अनादीचे पदार्थ आहेत, हे प्रतिपादन आपल्यासमोर केले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मगाशीरचा उल्लेख झाला, पहिल्यांदा आपण महाराष्ट्र आज म्हणतो पण पहिल्यांदा महाराष्ट्री असावे असे वचन म्हणणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते, आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून ही आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला प्रगट करणारे चक्रधर स्वामी होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने ‘जे जैसे असे ते तसे जाणिजे त्यानं’ असे निरूपण करून खऱ्या ज्ञानाची परिभाषा आपल्यासमोर सांगितली आणि विशेषता अहिंसेचा पुरस्कार करत हिंसा पाप पाप पावन नर्क अशा प्रकारचे वचन देऊन आपल्या सर्वांमध्ये अहिंसेचा एक भाव हा या ठिकाणी जागृत केला. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर चक्रधर स्वामींनी जनमानसात प्रबोधन केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचे सरकार
गेल्या दोन अडीच वर्षात रिद्धीपूर येथील विकास आराखड्याला निधी मिळालेला नाही, पण आता आपल्या महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचा सरकार या ठिकाणी आहे. त्यामुळे रिद्धपूर विकास आराखड्याला निश्चितपणे निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महानुभाव पंथाचे जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या स्थळे, स्थान आहेत. ते स्थान पुन्हा महानुभाव पंथाला परत मिळाले पाहिजे. या दृष्टीने लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या ठिकाणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे या संदर्भातल्या सगळ्या सूचना देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.